मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
देशातील बांधकाम व रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख संघटना ‘क्रेडाई’ने जीएसटी दरात झालेल्या अलीकडील कपातीचा उल्लेख करत, घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे घर खरेदीचा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
क्रेडाईच्या मते, केंद्र सरकारने अलीकडेच काही घरांच्या विक्रीवरील जीएसटी दरात कपात केली आहे. या कपातीचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा क्रेडाईचा मानस आहे. त्यामुळे लवकरच नव्या प्रकल्पांमध्ये घरांच्या किंमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी सर्वासामान्यांना दिलासा देणारी स्वस्त घरांची घोषणा केली. “कर कपातीमुळे होणाऱ्या खर्चातील बचतीचा किती भाग थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता येईल, यावर विकासक विचार करीत आहेत,” असं इराणी यांनी स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा (जीएसटी) कर रचनेत बदल केला आहे. त्यानुसार सिमेंटवरील जीएसटी कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. तर इतर बांधकाम साहित्यावरील जीएसटी करही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी कर रचना लागू झाल्यास बांधकाम साहित्यात घट होऊन बांधकाम शुल्क कमी होईल आणि घरे स्वस्त होतील अशी अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांकडून जीएटी परिषदेनंतरच व्यक्ती केली जात होती. आता यावर ‘क्रेडाई’ने शिक्कामोर्तब केलं आहे.
बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या या निर्णयाचे स्वागत करत, क्रेडाईने सरकारच्या धोरणाचे समर्थन केले आहे. मागणी वाढल्यास रोजगार निर्मितीसुद्धा चालना मिळेल, असेही ते म्हणाले.



