नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देशभरातील उत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यांना गौरविण्यासाठी आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा आज नवी दिल्लीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदाच्या पुरस्कारांसाठी देशभरातील १०३ सहकारी साखर कारखान्यांची निवड करण्यात आली होती. त्यामधून विविध गटांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या २५ कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राने नेहमीप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवत सर्वाधिक १० कारखान्यांनी पुरस्कार पटकावले. ‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ पुण्याच्या भिमाशंकर साखर कारखान्याला तर विक्रमी गाळपात कोल्हापूरच्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. त्यानंतर तमिळनाडूतील ५, उत्तर प्रदेशातील ४, गुजरातमधील ३ तर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी १ कारखान्याचा यामध्ये समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सहकारी साखर उद्योगाच्या देशाच्या आर्थिक विकासातील योगदानाचे कौतुक केले. “साखर कारखान्यांनी केवळ उत्पादनात नव्हे तर तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि शेतकऱ्यांच्या कल्याणामध्येही उल्लेखनीय कामगिरी करावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे सांगून सर्व विजेत्या कारखान्यांचे अभिनंदन केले.
विभागनिहाय पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :
उत्कृष्ट ऊस उत्पादकता गट :
-
प्रथम: विघ्नहर सहकारी साखर कारखाना, शिरोली (ता. जुन्नर, महाराष्ट्र)
-
द्वितीय: क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखाना (महाराष्ट्र)
-
तृतीय: श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग, सुरत (गुजरात)
तांत्रिक क्षमता गट :
-
प्रथम: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, कराड (सातारा)
-
द्वितीय: कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर (सोलापूर)
-
तृतीय: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, वांगी (सांगली)
उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन गट :
-
प्रथम: कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, जालना
-
द्वितीय: श्री खेडूत सहकारी खांड उद्योग मंडळी, पांडवाई (गुजरात)
-
तृतीय: श्री नर्मदा खांडसरी उद्योग सहकारी मंडळी, नांदोड (नर्मदा, गुजरात)
विक्रमी ऊस गाळप गट :
-
प्रथम: विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, माढा (सोलापूर)
-
विक्रमी: कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर
उच्च साखर उतारा – अत्युत्कृष्ट साखर कारखाना :
-
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (पुणे)
या पुरस्कार सोहळ्यात देशभरातील सहकारी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पुरस्कार मिळालेल्या सर्व कारखान्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत सहकारी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
———————————————————————————————-



