कोल्हापूरच्या ‘ऐसा क्या होता है’ चा सन्मान

टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाचा पुरस्कार

0
106
The film 'Aisa Kya Hota Hai', produced by Kolhapur's young and daring filmmaker Sayali Rajesh Chavan, won the Best Asian Film award at the prestigious Toronto International Film Festival.
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरची युवा आणि धडाडीची चित्रपट निर्माती सायली राजेश चव्हाण हिने पहिल्याच चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. तिच्या निर्मितीचा ‘ऐसा क्या होता है’ या चित्रपटाने टोरांटो येथील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट आशियाई चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. तसेच, या चित्रपटाची निवड मेलबर्न येथील आयएफएफएम ३६५ या नामांकित महोत्सवासाठी देखील झाली असून, त्या कार्यक्रमाला आमीर खान, आदिती राव, मुकेश छाब्रा यांसारख्या दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावून या चित्रपटाचे विशेष कौतुक केले.

वास्तूरचनाकार म्हणून पुण्यातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर सायली हिने मुंबई गाठली. तेथे चित्रपट क्षेत्रातील नामवंत धुरिणांसोबत काम करत अनुभव मिळवला आणि पुढे चिलीमिली एंटरटेनमेंट या नावाने स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. समाजातील महिलांना करावा लागणारा संघर्ष, त्यांच्या जीवनावर येणारा दबाव आणि त्यांच्या जिद्दीची कहाणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘ऐसा क्या होता है’ या चित्रपटाची निर्मिती तिने केली.

विशेष म्हणजे, तिच्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेली जागतिक दाद अभूतपूर्व ठरली आहे. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक व समीक्षकांनी एकसमान दाद दिली. त्यानंतर मेलबर्नमधील आयएफएफएम ३६५ मध्येही या चित्रपटाची निवड होणे ही सायलीसाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

सायली चव्हाण हिने प्रतिक्रिया देताना सांगितले, “कोल्हापुरातून सुरुवात करून मुंबईत चित्रपट क्षेत्रात काम करत पुढे स्वतःची संस्था उभारणे आणि त्या माध्यमातून समाजातील महिलांवर आधारित असा चित्रपट तयार करून जागतिक मंचावर त्याला मिळालेली दाद, हा माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी मोठा सन्मान आहे. महिलांवरील संघर्ष आणि त्यांच्या मानसिकतेला स्पर्श करणारी कथा जगभर पोहोचावी, हीच आमची ध्येयवृत्ती आहे.”

तिच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेला हा पुरस्कार अनेक तरुण निर्मात्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सामाजिक आशयावर आधारित चित्रपटही जागतिक पातळीवर गौरवले जाऊ शकतात याचा आदर्श ठरत आहे.
—————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here