मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य शासनाने नाट्यकर्मींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवातील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य तसेच व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिकांची रक्कम, नाट्यनिर्मिती खर्च आणि कलाकारांना देण्यात येणारा दैनिक भत्ता दुपटीने वाढविण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
सन २०१७ नंतर प्रथमच या पारितोषिकांत व भत्त्यांत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सहभागी कलाकार व संस्थांना अधिकाधिक नाटके सादर करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार :
-
हौशी राज्य नाट्य स्पर्धा व हौशी बालनाट्य स्पर्धेत सहभागी कलावंतांना मिळणारा दैनिक भत्ता पूर्वी ₹ १५० होता, तो आता ₹ ३०० करण्यात आला आहे.
-
परीक्षकांचा दैनिक भत्ता ₹ ४०० वरून ₹ ६०० इतका वाढविण्यात आला आहे.
-
पारितोषिके तसेच नाट्यनिर्मिती खर्चाच्या रकमांमध्येही दुपटीने वाढ करण्यात आली असून त्याबाबतचे सविस्तर तपशील शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्रात देण्यात आले आहेत.