पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
७४व्या इंटर सर्व्हिसेस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भालाफेकीत एक ऐतिहासिक कामगिरी घडली आहे. भारतीय खेळाडू शिवमने ८४.३१ मीटर अंतरावर भाला फेकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत २०१८ साली ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने केलेला ८३.८० मीटरचा विक्रम शिवमने मागे टाकला आहे.
शिवम लोहकरेची ही कामगिरी केवळ विक्रम मोडणारी नाही, तर भारताच्या भालाफेकीच्या इतिहासात नवा अध्याय लिहणारी ठरली आहे. नीरज चोप्रा यांचा विक्रम मागे टाकणं ही सहज गोष्ट नाही, पण शिवमने त्याच्या अचूक तंत्र, ताकद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे शक्य करून दाखवलं.
या स्पर्धेत देशभरातील तिन्ही सेनादलांतील सर्वोत्तम अॅथलिट सहभागी झाले होते. मात्र शिवमची भालाफेक ही संपूर्ण स्पर्धेतील आकर्षण ठरली. त्याच्या या प्रदर्शनामुळे आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
शिवम लोहकरे हा ८० मीटरच्या पलीकडे भाला फेकणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने हे यश केवळ १८व्या वर्षी मिळवलं होतं. शिवम सलग चौथ्यांदा ८० मीटरचा टप्पा ओलांडत असल्याने त्याचा आत्मविश्वासही उंचावला आहे.
नीरजच्या पावलावर पाऊल ठेवत चालणारा शिवम आता भारताच्या जेव्हलिन थ्रोच्या नव्या पिढीचा चेहरा बनतोय. त्याच्या या यशामुळे भारतीय अॅथलेटिक्समध्ये नव्या आशेची ज्योत पेटली आहे.
शिवमसाठी मोठा क्षण तो होता जेव्हा नीरज चोप्राने त्याला इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. “बधाई हो शिवम, वेरी गुड, असंच पुढे जात राहा,” असं नीरजने लिहिलं. त्यावर शिवमने मनापासून उत्तर दिलं, “थँक यू सो मच भैया.”
——————————————————————————————