सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात ऐतिहासिक सत्कार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी नेत्यांकडून गौरव

0
309
Today is a day to be remembered in golden letters in the history of the Maharashtra Legislative Assembly. Chief Justice of the Supreme Court Bhushan Gavai was felicitated jointly in both the Houses.
Google search engine

मुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानमंडळाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवावा असा ठरला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा दोन्ही सभागृहांत संयुक्तपणे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सर्वपक्षीय सदस्य आणि न्याय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या गौरवाच्या क्षणी भूषण गवई यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि साधेपणाचा गौरव करत अनेक दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गवई यांच्याबद्दल सांगितले, “हा सत्कार केवळ विधीमंडळाचा नाही तर १३ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. गवई यांचा साधेपणा अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, “सत्कारापेक्षा संविधानावर मार्गदर्शनाचे व्यासपीठ द्या अशी विनंती त्यांनी केली.” फडणवीस पुढे म्हणाले, “गवई साहेब न्यायमूर्ती असताना वन विभागाच्या मर्यादांमुळे रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये त्यांनी निर्णायक भूमिका घेतली आणि अडथळे दूर केले. ते उच्च न्यायालयात असताना वकिलांच्या हितासाठी नेहमी उभे राहिले. जर आज वकिलांकडून मतदान घेतलं गेलं, तर ७५% मतदान त्यांना मिळेल, असे सांगत फडणवीसांनी त्यांचा जनसंपर्क आणि विश्वासार्हतेवर भर दिला. एकही शनिवार-रविवार ते दिल्लीत राहत नाहीत. त्यांचं वेळापत्रक कायम लोकांमधलं असतं,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या क्षणाला ” गर्वाचा आणि आनंदाचा दिवस ठरला. गवई साहेब आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सर्वोच्च स्थानावर पोहोचले आहेत, ही महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे, ” असे सांगून त्यांनी भूषण गवई यांची शालीनता, गांभीर्य आणि कर्तव्यनिष्ठा यांचा गौरव केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक
अजित पवार म्हणाले, “आज अनेक सत्कार आपण सेंटर हॉलमध्ये पाहिले, पण आजच्या सत्काराची विशेष नोंद विधीमंडळाच्या इतिहासात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणजे लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची जबाबदारी. ही जबाबदारी भूषण गवई यांच्यासारख्या व्यक्तीकडे आहे, हे नशीब मानावं लागेल,” असे सांगत त्यांनी विधीमंडळातील वातावरण भारून टाकलं.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मराठी मनाचा अभिमान
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाषणात भूषण गवई यांचा गौरव करत म्हटले, “काल-परवाच कुणीतरी मराठी भाषेबद्दल प्रश्न उपस्थित केला, पण आज भूषण गवई यांनी ‘दिल्लीचेही तख्त राखतो, महाराष्ट्र माझा’ हे दाखवून दिले आहे. मराठवाडा-विदर्भ वेगळे नाहीत, हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं,” असे दानवे म्हणाले.

सर्व वक्त्यांच्या भाषणांमधून भूषण गवई यांच्या न्यायालयीन समर्पणासोबतच त्यांची जमिनीशी असलेली नाळ, त्यांच्या कुटुंबाचे मूल्य, आणि मराठी भाषेवरील निष्ठा अधोरेखित झाली. कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही सभागृहांनी उभं राहून मानवंदना देत त्यांचा सत्कार केला.

न्याय, विनय, लोकसंग्रह आणि कार्यक्षमतेचं मूर्तिमंत उदाहरण असलेले सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा गौरव होता. विधीमंडळाचा आजचा दिवस ही अभिमानाची आणि प्रेरणादायक घटनादिवस म्हणून कायम लक्षात राहील.

—————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here