जीएसटी मध्ये ऐतिहासिक बदल

चार ऐवजी फक्त दोन स्लॅब : सामान्यांना मोठा दिलासा

0
207
The central government has announced the biggest ever reform in the Goods and Services Tax (GST).
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
केंद्र सरकारने वस्तू व सेवा करात ( GST ) आजवरची सर्वात मोठी सुधारणा जाहीर केली आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत करप्रणाली सोपी करत, सध्याचे चार कर स्लॅब ( ५%, १२ %, १८ % आणि २८ %) रद्द करून फक्त दोन स्लॅब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार १२ % आणि २८ % स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता फक्त ५ % आणि १८ % कर देशभरात आकारला जाईल. हे बदल २२ सप्टेंबर पासून लागू होणार आहेत.
सरकारने याला “ नेक्स्ट-जनरेशन जीएसटी रिफॉर्म ” असं नाव दिलं असून या सुधारणा थेट सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, मध्यमवर्गीय आणि लघु उद्योजकांना दिलासा देणाऱ्या आहेत.
आरोग्य सेवा व विमा परवडणारे
आरोग्य क्षेत्रासाठी मोठा दिलासा देत सरकारने आरोग्य आणि जीवन विम्यावरील १८ % जीएसटी पूर्णपणे रद्द केला आहे. त्यामुळे विमा प्रीमियम स्वस्त होणार आहे. तसेच मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन, डायग्नोस्टिक किट, ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स, करेक्टिव्ह चष्मे आणि थर्मामीटर यांसारख्या आवश्यक वस्तूंवर आता फक्त ५ % कर आकारला जाईल.
शिक्षणाशी संबंधित वस्तू करमुक्त
मुलांच्या शिक्षणाशी निगडित सर्व वस्तू पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत. नकाशे, चार्ट, ग्लोब, व्यायाम पुस्तके, नोटबुक, पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन, पेस्टल व खोडरबर यावर लागणारा ५ % किंवा १२ % कर आता शून्य करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
कृषी क्षेत्रासाठी सरकारने ट्रॅक्टरवरील कर १२ % वरून ५ % केला असून ट्रॅक्टर टायर व सुटे भागांवरही कर १८ % वरून ५ % करण्यात आला आहे. तसेच जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषक द्रव्ये, ठिबक सिंचन, यंत्रणा आणि आधुनिक कृषी उपकरणे आता ५ % कर स्लॅबमध्ये आली आहेत. यामुळे शेती खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
वाहने व ऑटोमोबाईल्स स्वस्त
पूर्वी २८ % कर स्लॅबमध्ये असलेली काही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहने आता १८ % स्लॅबमध्ये आणली आहेत. तीनचाकी, 350cc पर्यंतच्या मोटारसायकली आणि व्यावसायिक मालवाहतूक वाहनांवरही आता १८ % जीएसटी आकारला जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहउपयोगी वस्तू स्वस्त
एअर कंडीशनर, ३२ इंचांपेक्षा मोठे टीव्ही / मॉनिटर्स, प्रोजेक्टर आणि डिशवॉशर वरील कर २८ % वरून १८ % केला आहे. यामुळे घरगुती उपकरणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना थेट फायदा होणार आहे.
व्यवसाय सुलभतेसाठी नवे नियम
सरकारने केवळ करदरच कमी केले नाहीत तर संपूर्ण प्रक्रिया सोपी केली आहे. आता स्वयंचलित जीएसटी नोंदणी फक्त तीन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण होणार आहे. तसेच प्रोव्हिजनल रिफंड आणि टॅक्स क्रेडिट मिळण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे.
या वस्तू होणार स्वस्त : 
चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा, आैषधे, आरोग्य विमा, पनीर पराठा, शार्पनर, पेन्सिल, वह्या, चार्ट, खोडरबर, नकाशे, दुर्मिळ आजारांच्या गोळ्या यावर एक टक्काही जीएसटी लागणार नाहीये. तेल, शाम्पू, इलेक्ट्रीक गाड्या, ब्रश, टूथपेस्ट, ब्रश, साबण, बटर, तूप, चीज, चिवडे, भूजिया, डायपर, थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषारसिंचनाची उपकरणे, शिलाई मशि, दुधाची बाटली या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागेल.
या वस्तू होणार महाग : 
गाड्या, महागड्या कार, महागड्या विदेशीत बाईक, पान मसाला, शितपेय, सर्व पॅकेज्ड पेय हे आता महाग होणार आहेत. दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी हा सरकारकडून हटवण्याच निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यासोबतच लग्झरी गोष्टींवरील जीएसटी हा चांगलाच वाढवल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे जर तुमचे आलिशान गाडी किंवा बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर आता तुम्हाला जास्त पैसे मोजावी लागणार हे स्पष्ट आहे.
जीएसटी कौन्सिलच्या निर्णयांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले “ मी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जीएसटी सुधारणा जाहीर करण्याचं संकेत दिलं होतं. या दर कपातीमुळे आणि सुलभ प्रक्रियेमुळे शेतकरी, महिला, तरुण, एमएसएमई आणि मध्यमवर्गीयांना थेट फायदा होईल. देशात व्यवसाय करणे अधिक सोपे होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.”
———————————————————————————————–
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here