कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
चित्रपट निर्मितीसमोर कलात्मकता, सृजनशीलता तसेच तंत्रज्ञानाची अनेक आव्हानं असून या तंत्रज्ञानाची मागणी जगभर आहे. म्हणूनच कोल्हापूर चित्रनगरीत पोस्ट प्रोडक्शनसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान येत्या काळात उभे राहणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या हस्ते कोल्हापूर चित्रनगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या चित्रीकरणासाठी आवश्यक विविध इमारतीचे उद्घाटन झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शनसाठी आवश्यक दुमजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार – याच चित्रनगरीत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) यांच्या सहकार्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तरुणांना चित्रपट व्यवसाय, तंत्रज्ञान आणि ऑडिओ-व्हिडिओ यासंबंधीचे प्रशिक्षण सुरू करणार आहोत. आणि या चित्रपट शिक्षण व्यवस्थेची सुरुवात याच वर्षी होणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरात जन्मलेल्या आणि कोल्हापूरमध्ये येऊन मराठी सिनेमासाठी कार्य केलेल्या कलाकारांनी मराठी सिनेमाची परंपरा समृद्ध केली असल्याचे सांगून त्यांनी अशा कलाकारांचे कलात्मक दालन (संग्रहालय) या ठिकाणी उभारण्याची घोषणाही केली.
महाराष्ट्राची खरी कलानगरी कोल्हापूर असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत १९८५ साली सुरू झालेल्या चित्रनगरीसाठी खऱ्या अर्थाने पुन्हा गती देण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नाटक, संगीत, लोककला, लोकवाद्य आणि लोकसंस्कृती ही महाराष्ट्राची ओळख आहे. तशीच मराठी सिनेमा ही महाराष्ट्राची जगभरातील ओळख आहे. या दिशेने काम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला. तत्कालीन अर्थमंत्र्यांनी दिलेला निधी तसेच आता प्रस्तावित असलेल्या १६ कामांसाठी आवश्यक निधी यासाठी आमदार अमल महाडिक यांनी सर्वात मोठा पाठपुरावा केला असून हे त्यांचे यश आहे असेही मंत्री शेलार यांनी सांगितले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर – कोल्हापूर चित्रनगरीला वास्तविक स्वरूप देण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि आमदार अमल महाडिक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. इतर विकासकामांबरोबरच चित्रनगरीलाही गती देणे आवश्यक आहे. ही चित्रनगरी पाहण्यासाठी लोक तिकीट काढून येतील. कलानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरासाठी ही वास्तू भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने उभी राहील, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया.
खासदार धनंजय महाडिक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विभीषण चवरे यांनी केले. नागरिकांना लोकार्पण दिनी कोल्हापूर चित्रनगरी पाहण्या साठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक पर्यटक प्रेमींनी गर्दी केली.

चित्रनगरीत बांधण्यात आलेले मंदिर ( १.४४ कोटी ), चित्रीकरणासाठी बांधण्यात आलेला वाडा ( ४.७० कोटी ), चित्रीकरणासाठी आवश्यक चाळ ( ३.१६ कोटी ), चित्रनगरीतील नवीन टॉक – शो स्टुडिओ बांधकाम ( ५.६९ कोटी ), चित्रीकरणासाठी आवश्यक रेल्वे स्टेशन, चित्रीकरणासाठी आलेल्या मनुष्यबळासाठी बांधण्यात आलेले वसतिगृह या इमारतींचे लोकार्पण झाले. तसेच, पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओसाठी दुमजली इमारतीचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. या सर्व कामांची एकूण किंमत ४४ कोटी रुपये इतकी आहे.
उपस्थिती- आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मोरेवाडी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कोल्हापूरमधील चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कलाकार, तंत्रज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————————————————————————



