मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने प्रशासन युध्द पातळीवर काम करत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हवामान विभागाने २१ ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला असून १५ ते १६ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात धरणांचा ताण
कोकणात रेड अलर्ट देण्यात आला आहे. अंबा, कुंडलिका आणि जगबुडी नद्यांची पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, पाटगाव, कासारी धरण पाण्याने तुडुंब भरले असून दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढली आहे. साताऱ्यात कोयना धरण ८७ टक्के भरले असून सुमारे १२,१०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. सांगली जिल्ह्यातही पाऊस सुरू असून सतत ढगाळ वातावरणामुळे सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
नाशिक-जळगाव विभागात बिकट परिस्थिती
नाशिक विभागात तापी आणि हतनूर नदीची पाणीपातळी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घरांचे आणि गुरांचे मोठे नुकसान झाले आहे. रावेरच्या काही भागात पाणी शिरले असून परिस्थिती बिकट झाली आहे. पुण्यात पाऊस सुरू असला तरी कोणत्याही नदीने अद्याप धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.
नांदेड विभागात पूरग्रस्त गावं
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात लेंडी धरण भरून वाहत आहे. लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून येणाऱ्या पाण्यामुळे स्थिती गंभीर झाली आहे. काल मुखेड तालुक्यात तब्बल २०६ मिमी पाऊस झाला. रावनगाव, भासवाडी, भिंगेली आणि हसनाळ या गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली.
-
रावनगावात २२५ नागरिक पाण्यात अडकले होते, त्यापैकी काहींना बाहेर काढण्यात आले असून उर्वरितांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे.
-
हसनाळ येथे ८ नागरिक, भासवाडी येथे २० तर भिंगेली येथे ४० नागरिक अडकले असले तरी ते सुरक्षित आहेत.
-
मात्र पाच नागरिक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
मदत व बचावकार्य सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, नांदेड, लातूर आणि बिदर या तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी समन्वयातून काम करत आहेत. एनडीआरएफची एक चमू, लष्करी पथक आणि पोलीस दल बचावकार्य करत असून छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची तुकडी रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सतत तळ ठोकून नागरिकांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील काही दिवसांचा अंदाज
हवामान विभागानुसार, पुढील काही दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव आणि नांदेड जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तापमान २१ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असून पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————————————————————————–