कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण राज्यात धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा परिणाम गोदावरी नदीच्या पूरस्थितीवर दिसून येत आहे. नाशिकमधील गंगापूर धरणातून आज दुपारी बारा वाजता ३७१६ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
नाशिकमधील रामकुंड परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. पूरस्थितीमुळे परिसरातील छोटे-मोठे मंदिर पाण्यात बुडाली आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उजनी धरणातील पाण्याचा विसर्ग तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
राज्यात बहुतांश धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही धरणांमधून नियोजित विसर्गही सुरू करण्यात आला आहे. परिणामी, राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील प्रमुख धरण प्रकल्पांमध्ये सध्या ५० टक्क्यांहून अधिक जलसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी फक्त १५ टक्के उपयुक्त जलसाठा होता, तो यंदा तब्बल ५८.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसामुळे धरणसाठा गेल्या वर्षीच्या १७ टक्क्यांवरून यंदा ५२.५४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
मराठवाडा भागातही पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास राज्यातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे.
————————————————————————————