प्रसारमाध्यम डेस्क
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज अनेक ठिकाणी पावसााने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात पाऊस होताना दिसत आहे. आता भारतीय हवामान विभागाकडून पुढील २४ तासांकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणायचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस पडला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
आत्तापर्यंत झालेल्या पावसाची नोंद?
राज्यात कालपासून आज १७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी खालील प्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :-
ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जगबुडी नदी इशारा पातळीवर
रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.
पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली
सातारा जिल्ह्यातील पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगार्याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.