पुणे : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा वेग मंदावला असला तरी पुढील आठवड्यात देशभरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभाग आणि स्कायमेटच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात १२ ऑगस्टला कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून १३ ऑगस्टला तो अधिक मजबूत होईल. याचा परिणाम देशाच्या अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाच्या स्वरूपात जाणवणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी
राज्यात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर मंदावला होता, मात्र येत्या आठवड्यात पावसाची गती पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. कोकणासह राज्यातील इतर भागांत पावसाचा जोर वाढेल. विशेषत: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळेल, तर जलसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.
पूर्व भारतात मुसळधार पाऊस
या प्रणालीमुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि गोवामध्येही पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागानुसार, पुढील सात दिवस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि बिहारमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राजस्थान-गुजरातमध्ये इशारा
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात राजस्थान आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा पाऊस शेतीसाठी लाभदायक ठरणार असला तरी अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय तातडीने राबवणे गरजेचे आहे.
——————————————————————————————-