अनिल जासूद : कुरुंदवाड
जून महिन्याची १२ तारीख उजाडली तरी ही शिरोळ तालुक्यात मान्सून सक्रिय झाला नाही. यामुळे तालुक्यात पाऊस थांबला असला तरी उष्मा वाढला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस होत असला तरी या तालुक्यात मात्र अजूनही मान्सूनच्या पावसाचे प्रमाण निरंकच आहे.
मे च्या मध्यावर शिरोळ तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस धो…धो…बरसला. तब्बल पंधरा दिवस एक ही रजा न घेता दररोज धुवाँधार हजेरी लावली. दिवसा थोडी उघडीप दिला तरीही सायंकाळी रात्रभर झोडपून काढायचा. धरणातून कोणत्याही प्रकारचा विसर्ग नसताना फक्त पावसाच्या पाण्यामुळे तालुक्यातील कृष्णा-पंचगंगा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. शेत-शिवारातील सरीतून पाणीच पाणी साचून राहिले.
मे महिन्यातील या पावसामुळे दिवसभर वातावरण ढगाळ रहायचे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मान्सून पूर्व पावसामुळे पंधरा दिवस सूर्याचे दर्शनच झाले नाही. मे महिन्यात आजतागायत असा पाऊस कधीच झाला नाही असे जुने जाणकार सांगतात. इतकेच नव्हे तर मे महिन्यासारख्या ऐन उन्हाळ्यात घरातील,आॅफीसमधील पंखे, वातानूकुलीत एसी, कुलर आदी चा वापर करावा लागला नाही. यामुळे अनेकांनी आपले पंखे व्यवस्थित पॅक करुन सुरक्षित ठिकाणी ठेवून दिले.
ऐन उन्हाळ्यात यांचा वापर झाला नसल्यामुळे सर्वांची वीजबीले ही कमी आली आहेत. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस दडी मारलेला मान्सून पूर्व पाऊस आता मान्सून सुरू होऊन जून चा पंधरवडा संपत आला तरी अजून बरसला नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात उष्माचा पारा वाढला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे बंद ठेवलेले पंखे, कुलर, एसीचा पुन्हा वापर करावा लागत आहे. जिथे जिथे ढग आहे तिथे अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र यामुळे उष्म्यांमध्ये आणखीनच वाढ होत आहे.
—————————————————————————————