कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून धरण क्षेत्रात धुवाधार पावसाची नोंद झाली आहे. शहर व परिसरात रिपरिप पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत आंबा आणि गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. डोंगराळ भागांत संततधार पावसामुळे बहुतांश धरणांचा साठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
आंबा येथे २४ तासांत ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, गगनबावडा तालुक्यात तब्बल ८८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्यात २४.८ मिमी, भुदरगड तालुक्यात १८.६ मिमी, आजरा तालुक्यात ११.४ मिमी आणि पन्हाळा तालुक्यात १०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्ये १० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४०७ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी ४२९.४ मिमी पाऊस होऊन सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात १०५ मिमी पाऊस जास्त पडला आहे. सध्या जिल्ह्यात सरासरीच्या २२.८२ टक्के पाऊस झालेला आहे.
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः राधानगरी धरणाची पाणी पातळी ६५ टक्के, तर वारणा धरणाची पाणी पातळी ७० टक्के झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस असून, काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु आहे.
धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नदीची पाणी पातळी स्थिर आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी सकाळी ६ वाजता ३१ फूट होती, तर रात्री १० वाजताही ती तेवढीच राहिली आहे. जिल्ह्यातील ३६ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
दरम्यान, पुणे हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील चार दिवसांत घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
—————————————————————————————



