पुणे : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढत असून हवामान विभागाने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा सिलसिला सुरू असून येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या भागांसाठी ऑरेंज अलर्ट :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाट परिसरात आज, २ जुलै २०२५ रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उर्वरित भागांमध्ये यलो अलर्ट :
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू :
कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा आणि नद्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून संभाव्य आपत्ती परिस्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक ती तयारी ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
—————————————————————————————————-






