घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट : पावसाचा जोर कायम राहणार

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

0
97
Google search engine

मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज 

येत्या काही दिवसांत पावसाचा हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात अधूनमधून सरी कोसळत होत्या. मात्र, शनिवार सकाळपासून पूर्णपणे उघडीप राहिली. दुपारनंतर तर कोल्हापूर शहरात चक्क ऊन पडले आहे. धरण क्षेत्रांतही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी करण्यात आला आहे. राधानगरी  धरणांतून प्रतिसेकंद ३,१००, वारणातून १,७३५ तर दूधगंगातून १,६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पावसाची उघडीप असली तरी नद्यांचे पाणी संथगतीने कमी होत आहे. 

पुढील चार दिवस पावसाचा इशारा
२८ जून ते १ जुलै या कालावधीत राज्यातील बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सातारा-कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या पश्चिम भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पंचगंगा नदीचे पाणी दिवसभरात फुटाने कमी झाले आहे. अद्याप ३८ बंधारे पाण्याखाली असून, वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी दुपारी एकपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, पण उघडीप राहिली. आज, शनिवारी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला असून उद्या, रविवारपासून दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ राहील, असे हवामान विभागाने सांगितले आहे

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये २८ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रकिनारी आणि डोंगराळ भागांत पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातही पावसाची शक्यता
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
बीड, परभणी, लातूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मराठवाड्यातील बीड, परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार असला तरी मुसळधार पावसामुळे नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

राज्यभर पावसाचा जोर येत्या काही दिवसांत कायम राहणार असून, काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

.

————————————————————————————

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here