
मेघालय : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये निसर्ग सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. मेघालय तर या सौंदर्याची शानच वाढवणारा प्रदेश. अलीकडेच महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी आपल्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर मेघालयातील एका नयनरम्य गावाचा व्हिडीओ शेअर करत नेटिझन्सना थक्क केलं. हा व्हिडीओ नोंगज्नोंग या मेघालयातील मोहक गावाचा असून, याला पाहून सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे.
खासी हिल्समधलं डोंगरमाथ्यावरचं रत्न
नोंगज्नोंग हे मेघालयच्या खासी हिल्समधील मावकिन्नेव येथे समुद्रसपाटीपासून तब्बल १०९४ मीटर उंचीवर वसलेलं आहे. सुमारे १४४० लोकसंख्या असलेल्या या गावात खासी आणि इंग्रजी या दोन भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात. हिरव्यागार डोंगररांगा, थंडगार हवा आणि स्वच्छ परिसरामुळे हे ठिकाण पर्यटकांना जणू स्वर्गीय अनुभव देतं. राजधानी शिलाँगपासून फक्त ६० किमी अंतरावर असल्याने हे गाव सहज गाठता येतं.
नोंगज्नोंगमध्ये पाहण्यासारखी ठिकाणं
-
नोंगज्नोंग व्ह्यू पॉईंट : गावाच्या डोंगरमाथ्यावर असलेला हा व्यू पॉईंट निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे. इथून सूर्योदयाचा नजारा विशेष मोहक भासतो. पहाटेची कोवळी किरणे हिरवाईवर सोनेरी झळाळी पसरवताच डोंगर जणू सोन्याचा झाल्यासारखा दिसतो.
-
ट्रेकिंग आणि साहस अनुभव : घनदाट झाडीने व्यापलेल्या या डोंगरावर ट्रेकिंगचा रोमांचक अनुभव घेता येतो.
-
उमंगोट नदीवरील राफ्टिंग : भारतातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक मानली जाणारी उमंगोट नदी येथे साहसप्रेमींसाठी मोठं आकर्षण आहे. तिच्या पारदर्शक पाण्यात रिव्हर राफ्टिंग करताना पाण्याच्या निळसर हिरव्या लाटा डोळ्यांना वेड लावतात.
मुक्कामासाठी होमस्टेचा अनुभव
नोंगज्नोंगचे रहिवासी साध्या जीवनशैलीत राहतात आणि पर्यटकांनाही याच अनुभवात सहभागी होण्याचं आमंत्रण देतात. येथे स्थानिक होमस्टेमध्ये राहून खासी संस्कृती, त्यांचे खाद्यपदार्थ आणि परंपरा जवळून अनुभवण्याची संधी मिळते.
नोंगज्नोंगला कसे पोहोचाल ?
-
हवाई मार्ग : जवळचं विमानतळ गुवाहाटी (लोकप्रीय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ) असून तेथून नोंगज्नोंग साधारण १०० किमी अंतरावर आहे. गुवाहाटीवरून टॅक्सी किंवा बसने सहज प्रवास करता येतो.
-
रस्ता मार्ग : शिलाँगहून थेट टॅक्सी किंवा स्थानिक वाहनांनी २-३ तासांत गावात पोहोचता येतं.





