नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या पारंपरिक निवडणूक चिन्हाच्या मालकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर अखेर सुनावणीची तारीख ठरली आहे. ठाकरे गटाकडून आज ( २ जुलै ) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात तातडीने सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली.
ठाकरे गटाच्या वतीने वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना, “लोकांना चिन्ह निवडण्याचा अधिकार आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे हा वाद निकाली लावणे अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. मात्र, न्यायालयाने “यामध्ये इतकं तातडीचं काय आहे?” असा सवाल करत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.
न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी १६ जुलै २०२५ ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हावरचा अंतिम निर्णय अद्याप रखडला असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
दोन वर्षांपासून प्रलंबित वाद
२०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर सुरू झालेला शिवसेना पक्षांतर्गत संघर्ष, त्यानंतर झालेली फूट आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा घेतलेला निर्णय यामुळे ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर दोन वर्षांपासून सुनावणी प्रलंबित आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय आणि त्यावर आक्षेप
२०२३ मध्ये निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयात धाव घेतली होती. “धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या भावना आणि पक्षाची ओळख आहे,” असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
महापालिका निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. अशा परिस्थितीत धनुष्यबाण चिन्ह कोणाच्या हातात जाणार, यावर दोन्ही गटांचे भवितव्य आणि रणनीती ठरणार आहे. त्यामुळे १६ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.
———————————————————————————-