नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर, त्या निर्णयाविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी दुसऱ्या क्रमांकाच्या कोर्टात, न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
विशेष बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वादग्रस्त चिन्ह प्रकरणाची देखील सुनावणी याच खंडपीठासमोर झाली होती. त्या वेळी कोर्टाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्ह तात्पुरते वापरण्याची परवानगी दिली होती, पण त्याचबरोबर एक स्पष्ट अट घातली होती. हे चिन्ह अंतिम निर्णयाच्या अधीन असून, त्याचा उल्लेख जाहीररीत्या करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अजित पवार यांना वृत्तपत्रांमधून हे स्पष्ट करावं लागलं होतं की, हे चिन्ह आणि नाव केवळ अंतरिम आदेशाच्या अधीन आहेत.
आता शिवसेना (ठाकरे) गटानेही आपल्या याचिकेत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात जसे निर्देश दिले गेले तसेच निर्देश आपल्या प्रकरणातही द्यावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका, जिल्हा परिषद आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
हा निकाल फक्त चिन्हावरचा तात्पुरता अधिकार नव्हे, तर ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय अस्तित्वावरही दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वोच्च न्यायालयात या वादावर निर्णयाची दिशा ठरणार असल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे.
हे नजर या वरही….👇