कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कतारमध्ये चांगली नोकरी होती. मोठा पगार आणि अन्य सुविधाही होत्या. तरीदेखील त्यांना ती नोकरी सोडावी वाटली. का तर, कतारमधील दह्याची चव त्यांना खूप आवडली. या चाविनेच त्यांना यशस्वी उद्योजक बनविले. ही यशस्वी गाथा आहे, केरळमधील नहाज बशीर यांची. आज नहाज यांचे उत्पादन पंचतारांकित हॉटेलमध्ये विकले जाते. त्यांचे अंबानीही ग्राहक आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल आहे, १५ कोटी रुपये.
नहाज बशीर यांनी विदेशातील नोकरी सोडून भारतात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी ‘क्रेमबेरी’ नावाची दही बनवणारी कंपनी उघडली. त्यांच्या ग्राहकांमध्ये अंबानी कुटुंबाचाही समावेश आहे. आज त्यांची कंपनी कोट्यवधींचा व्यवसाय करत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी डिजिटल मार्केटिंगचा वापर न करता स्वतः मॉलमध्ये जाऊन दहीचे सॅम्पल वाटले. २०२० मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर १५ कोटी रुपये आहे.
व्यवसायासाठी आईचा पाठिंबा
नहाज बशीर हे मूळचे केरळचे आहेत. त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या टिश्यू पेपर बनवण्याच्या व्यवसायातून धंद्याचे ज्ञान घेतले. २० व्या वर्षी त्यांना कतारमध्ये चांगली नोकरी मिळाली. पण, स्वतःचा व्यवसाय करायचा असल्याने त्यांनी ती सोडली. त्यांच्या घरच्यांना हे आवडले नाही, पण त्यांच्या आईने त्यांना पाठिंबा दिला. नहाजला भारतात चांगल्या प्रतीचे दही आणायचे होते.
नहाजची यशोगाथा कतारमधून सुरू झाली. ते जेव्हा भारतात यायचे, तेव्हा त्यांना कतारसारखे चांगले दही मिळत नसे. कतारमधील दह्याची चव त्यांना आवडायची. केरळच्या दह्यात आंबटपणा असतो, जो त्यांना आवडत नसे. म्हणून, त्यांनी भारतात चांगले दही बनवण्याचा निर्णय घेतला.कतारमधील नोकरी सोडल्यावर नहाजने 2020 मध्ये ‘क्रेमबेरी’ कंपनी सुरू केली. या कंपनीने बाजारात एक नवीन चव आणली. त्यामुळे ती हळूहळू यशस्वी झाली.
चेष्टा केली पण हार मानली नाही
आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नहाजने मॉल आणि मेट्रो स्टेशनमध्ये मोफत दही वाटायला सुरुवात केली. काही लोकांना ते आवडले, तर काहींना आंबट दहीच आवडायचे. काही मित्र आणि नातेवाईकांनी त्यांची चेष्टाही केली. पण, नहाजने हार मानली नाही. त्यांनी लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आपल्या उत्पादनात बदल केले. हळूहळू नहाजच्या मेहनतीला यश आले. त्यांनी केरळमधील लुलु मॉलपासून सुरुवात केली. त्यांचे दही केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये मिळू लागले.
अंबानीही ग्राहक
फाइव्ह-स्टार हॉटेलसोबत काम केल्याने त्यांच्या कंपनीला आणखी ओळख मिळाली. अंबानी कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना मोठा फायदा झाला. नहाज सांगतात, “अंबानी कुटुंबाने त्यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नासाठी १० हजारांपेक्षा जास्त दहीचे पाकिट मागवले होते. बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांसारख्या पाहुण्यांनीसुद्धा आमच्या दहीची चव घेतली. आमच्या स्टाफने त्यांना दही खाताना पाहिले. मला खूप आनंद झाला.”
आजकाल नहाज यांचे दही फाइव्ह-स्टार हॉटेलमध्ये मिळते आणि फ्लाइटमध्येसुद्धा दिले जाते. लोकांना क्रेमबेरीचे नवीन फ्लेवर खूप आवडत आहेत. विशेषतः, मसालेदार संभाराम दही आणि फळांपासून बनवलेले दही लोकांना खूप आवडत आहे.