प्रसारमाध्यम डेस्क
“कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणून ओळख असणारे हसन मुश्रीफ महाविकस आघाडी सरकारच्या काळात राज्याचे गृहमंत्री झाले असते”, असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांचा पुस्तकात म्हटलं आहे. या पुस्तकावर महायुतीतील नेत्यांनी भरपूर टीका केली आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना ईडी ने अटक केली होती त्यावेळी ते १०० दिवस तुरुंगात होते. या १०० दिवसांच्या तुरुंगवासात संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकात त्यांनी महाविकस आघाडीची स्थापना कशी झाली यावर सविस्तर लिहून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनवर आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात राज्याचे वैधकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. महाविकस आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर गृहमंत्री पद कोणाकडे सोपवायचं, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत संजय राऊत त्यांच्या पुस्तकात असं म्हणतात की, “अजित पवार फडणवीस यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी आटोपून रिकाम्या हाताने स्वगृही परतले होते, त्यामुळे त्यांचा गृहमंत्री पदासाठी विचार होईल असं वाटलं नाही. छगन भुजबळ त्यावेळी नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते तरीही त्यांच्यावर खटले सुरू होते. ते गृहमंत्री पदासाठी इच्छुक होते पण त्यांचा तुरुंगवास यासाठी अडचण ठरली असावी. जयंत पाटील यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी नकोच होती. दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हा एक चांगला पर्याय गृहमंत्री पदासाठी होता. हसन मुश्रीफ यांचासारखा कोल्हापूरचा रांगडा आणि तगडा गाडी या पदासाठी चांगला पर्याय ठरू शकला असता. त्याशिवाय ते पुरोगामी विचारांचे आणि छत्रपती शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असणारे दिलखुलास असे व्यक्तिमत्व आहे. मात्र ते मुसलमान असल्याने त्यांना ‘टार्गेट’ केले जाईल अशी शरद पवारानां भिती वाटली अन्यथा आज ते राज्याचे गृहमंत्री असते.”
संजय राऊत यांच्या या पुस्तकातील दाव्याने राजकारणात जरी खळबळ उडाली असली तरी मुश्रीफ समर्थकांमध्ये मात्र खुशी दिसून येत आहे. या पुस्तकातील हा मजकूर असणारं पुस्तकाचं एक पान समाज मध्यमांवर फिरताना दिसत आहे.