कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची निवड होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा अचानक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या जागी कुणाची निवड होईल याची चर्चा होत असताना हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वानुमते पुढे आले.
जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे राजीनामापत्रात म्हंटले आहे. पदावर असतानाच प्रकृतीच्या किंवा इतर कारणामुळे राजीनामा देऊ करणारे धनखड हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती होय. धनखड यांनी धक्कातंत्राचा वापर करीत पदाचा राजीनामा दिल्याची बातमी सर्वत्र वेगाने पसरली. धनखड यांची गेले काही दिवस प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होत्या. नुकतेच त्यांचे एम्समध्ये हृदयाचे ऑपरेशनही झाले होते. संसदेचे अधिवेशन सुरु होत असतानाच त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही आला नाही. राज्यसभेत धनखड यांनी दोनदा भाषणे केली. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठकही त्यांच्या दालनात झाली होती.
धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे, तत्काळ प्रभावाने मी हे पद सोडत आहे, असे त्यांनी यात म्हटले आहे. प्रकृतीची प्राधान्याने काळजी घेण्याचा वैद्यकीय सल्ला मला देण्यात आल्याने मी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. राज्यघटनेच्या कलम ६७ (अ) अंतर्गत स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी राष्ट्रपतींना उद्देशून लिहिले आहे. ७४ वर्षीय धनखड यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये या पदाची सूत्रे स्वीकारली होती.
———————————————————————————