कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यभर उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेले नागरिक आता एका नव्या हवामान बदलाच्या संकटाशी सामना करत आहेत. मे महिन्यात गारपिटीसारखी अतिशय अनपेक्षित हवामान स्थिती सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अनुभवायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पाच जिल्ह्यांमध्ये गारपिटीचं संकट राहील. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
२ आणि ३ मे रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान कोरडं किंवा ढगाळ राहील. असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर ४ आणि ५ मे रोजी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी तुरळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या कोरडं हवामान राहणार आहे. त्यानंतर पुढचे तीन दिवस धुवाँधार पाऊस होईल. ४० किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाट परिसर या जिल्ह्यात देखील ३ मे पासून पुढचे तीन दिवस यलो अलर्ट दिला असून पाऊस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला. आज मात्र या जिल्ह्यात कोरडं हवामान राहणार आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही ठिकाणी कोरडं तर काही ठिकाणी पावसाचं हवामान राहील, पुढचे तीन दिवस मात्र सतत हवामान बदलत राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विशेषत: महत्त्वाचा अलर्ट देण्यात आला आहे.
जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावतीमध्ये देखील कोरडं किंवा पाऊस असं हवामान राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपीट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या पार्श्वभूमीवर आधीच काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पुढचे ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
—————————————————————————————–



