कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
परीक्षेच्या निकालाची उत्सुकता कुणाला नसते? कोणतीही परीक्षा असो अथवा कितीही वय असो. जो व्यक्ती स्वत:ला विद्यार्थी समजत असतो तो परीक्षा द्यायला कायम तयार असतो आणि त्याला निकालाचीही उत्सुकता असते. भाईंदरच्या आजोबानीही आपल घर, संसार, नोकरी करत चिकाटीने रात्री जागून बारावीचा अभ्यास केला. बारावीची परीक्षा दिली आणि बारावी परीक्षा पास देखील झाले. या आजोबांचे नाव आहे, गोरखनाथ मोरे.
गोरखनाथ मोरे आजोबा नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना ४४.५० टक्के गुण मिळाले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचं वकील व्हायचं स्वप्न होतं. त्या मार्गातील एक टप्पा पूर्ण झाल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत.
आता त्यांनी वकील होण्यासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षाही दिली आहे. प्रवेश घेतल्यावर पाच वर्षं त्यांना वकिली पूर्ण करण्यासाठी लागतील. म्हणजे वयाच्या ८४ व्या वर्षी ते वकील होतील. आपण नक्कीच वकील होऊ हा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतो. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते हेच त्यांच्या देहबोलीतून जाणवते.
मोरे आजोबा सेटल आहेत. या वयात त्याना नोकरीची आणि शिक्षणाची कशाचीही गरज नाही. तरीही ते विद्यार्थी होऊन अभ्यास करतात. आजोबा 10 वी उत्तीर्ण झाल्यावर नौदलात भरती झाले. त्यांनी मास्टर चीफ पेट्टी ऑफिसर (Master Chief Petty Officer) या पदावर 32 वर्षं सेवा केली. नोकरी करत असताना आपण बारावी झालो नाही याची खंत त्याना होती.
मग त्यांनी एकदा परीक्षेसाठी दोन महिन्यांची रजा घेतली. हे वर्षं होतं १९६६. तेव्हा शिक्षकांचा राज्यव्यापी संप झाला आणि परीक्षा रद्द झाल्यामुळं त्यावर्षी परीक्षाच देता आली नाही, असं मोरे आजोबा सांगतात. त्यानंतर ते सेवेतून निवृत्त झाले आणि एका बिल्डरकडे लिगल विभागात काम करू लागले. त्यानिमित्ताने त्यांना सतत कोर्टात जावं लागायचं. त्यातून आपण पुन्हा बारावीची परीक्षा द्यायला हवी, असा विचार पुन्हा पुन्हा डोकं वर काढायचा.
मोरे आजोबा सध्या ठाण्यात एका नामांकित बिल्डरकडे लीगल विभागात असिस्टंट म्हणून गेली १७ वर्षं काम करत आहेत. या टीममध्ये १५ ते २० वकील आहेत आणि मोरे आजोबा दररोज कोर्टात कामानिमित्त जातात.
मोरे आजोबा सांगतात, “माझं काम बघून अनेक वकील म्हणायचे की, तुम्हाला कायद्याचं चांगलं ज्ञान आहे, मग तुम्ही वकील का नाही झालात? एकदा तर सुप्रीम कोर्टातील एका वरिष्ठ वकिलांनी मला थेट विचारलं की, तुमचं शिक्षण का अर्धवट आहे? तुम्ही आत्तापर्यंत ३ वेळा वकील झाला असता, मी त्यांना सांगितलं की आता वय राहिलं नाही. तेव्हा त्यांनी म्हटलं, शिक्षणाला वय नसतं. हे शब्द मनाला इतके भिडले की मी ठरवलं आता काही झालं तरी १२ वी पूर्ण करायची,”
मोरे आजोबा सांगतात “मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे, ही गोष्ट मी जेव्हा माझ्या घरी सांगितली. तेव्हा सर्व जण आनंदी झाले. माझी मुलगी डॉक्टर आहे तर मुलगा मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी फॉर्म भरला आणि मी तयारी सुरू केली. तसेच, मी जेव्हा शिकत आहे म्हटल्यावर माझ्या ऑफिसमधल्या लोकांना आनंद झाला आणि त्यांनीही मला पूर्ण सहकार्य केले.”
“मी भाईंदर ते ठाण्याला रोज बसने प्रवास करतो. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास हा प्रवास माझ्या अभ्यासासाठी उपयोगात आणला,” असं मोरे आजोबा सांगतात.
प्रवासादरम्यान पुस्तकं वाचणं, नोट्स काढणं आणि धडे पाठ करणं हे त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलं. घरी आल्यावर जेवण करून रात्री १२ वाजेपर्यंत नियमित अभ्यास करायचा, असा त्यांचा दिनक्रम होता.
ट्युशनला जाण्यासाठी वेळ नव्हता आणि मला तशी गरजही वाटली नाही. मी सेल्फ स्टडी केली असं मोरे आजोबा सांगतात. त्यांच्या मुलगा, मुलगी आणि सून यांनीही अभ्यासात मोलाची मदत केली.
७९ व्या वर्षी आपली तब्येत खणखणीत असल्याचं ते अभिमानाने सांगतात. माझे दात अजून चांगले आहेत, कानाने स्पष्ट ऐकता येतं आणि डोळ्यांना चष्मा नाही. त्यामुळे अभ्यास करताना शरीरावर कोणताही ताण आला नाही, असं ते आवर्जून सांगतात.
आजोबा एवढ्यावरच थांबणार नाहीत, त्यांनी वकील होण्यासाठी आता एल. एल. बी. चा अभ्यासही सुरु केला आहे.
गोरखनाथ मोरे वयाने आजोबा असले तरी मनाने किशोरच आहेत. घरचे काम, ऑफिसचे काम आणि हे सर्व सांभाळून जिद्दीन अभ्यास करन हे त्यांचे वाखाणण्याजोगे आहे. अजोबांचा आदर्श घेण्यासारखा आहे.