कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अल्लादियाखाँ यांना आपल्या गायनाची दखल घ्यायला लावणारी व्यक्ती म्हणजेच कोल्हापूरची शान, रसिकप्रिय कलावंत गोविंदराव सदाशिव टेंबे. आज ५ जून त्यांची जयंती. कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासात अग्रस्थान मिळवलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने आपल्या कर्तृत्वाने कोल्हापूरला खर्या अर्थाने कलापूर बनवले.
कोल्हापूरपासून अवघ्या पंधरा किलोमीटर वरील सांगवडे गावात टेंबेंचा जन्म झाला. बालवयापासूनच त्यांच्यात विलक्षण कलासंवेदनशीलता होती. प्राथमिक शिक्षण त्यांनी शुक्रवार पेठेतील शाळेत घेतले, माध्यमिक शिक्षण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये पूर्ण केले. उच्च शिक्षण पूर्ण न करताही त्यांच्या अंगभूत बुद्धिमत्तेची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना थेट ‘वकीलीची सनद’ दिली. हे त्यांच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरले.
संगीताची अजब खोपडी

टेंबे हे हार्मोनियम वादनाचे पट्टीचे जाणकार, संगीतकार, नाट्यसंगीताचे प्रयोगशील अभ्यासक होते. त्यांच्या अद्वितीय संगीतशैलीमुळे अल्लादियाखाँ सारख्या गुरूंनाही त्यांची प्रशंसा करावी लागली. अल्लादिया खाँ यांनी त्यांना आपला शिष्य मानले, हेच टेंबेंच्या कलागुणांचे मोठे प्रमाणपत्र म्हणावे लागेल.
टेंबेंची रंगभूमीवरील कारकीर्दही तितकीच समृद्ध होती. त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या नाटकांनी मराठी रंगभूमीला नवे वळण दिले. संगीताबरोबरच ते एक रसग्रहण करणारे लेखक आणि विचारवंतही होते. त्यांच्या आत्मचरित्रात आणि संगीत विषयक लेखनात त्यांच्या संवेदनशीलतेचा, तळमळीचा ठसा उमटलेला दिसतो.
संगीताचे क्षेत्रात त्यांची कामगिरी –
- १९११ नंतर संगीत मानापमान सह १८ नाटकाना संगीत दिले.
- २१ नाटकात गायकनट म्हणून भूमिका केल्या.
- स्वत : ८ संगीत नाटके लिहिली.
- १९३२ च्या अयोध्येचा राजा पासून सैरंध्री, सिंहगड पर्यंत १७ चित्रपटात गायक व नट म्हणून भूमिका केल्या.
- हार्मोनियम वादनाच्या १५ ध्वनिमुद्रिका निघाल्या ज्यात नाट्यगीते प्रामुख्याने आहेत.
- सात ते आठ वर्षे त्यांनी स्वतःची शिवराज नाटक कंपनी चालवली.
- ग्रंथलेखक नात्याने संगीतावर सात पुस्तके लिहिली.
- रेडिओसाठी जयदेव व महाश्वेता या स्वरनाटिका लिहिल्या.
- वि.ना.भातखंडेनी ज्याप्रमाणे दहा थाटात दीडशे रागांची मांडणी केली, त्यानंतर गोविंदराव यांनी पंधरा जाती मधे सव्वाशे रागांचे वर्गीकरण केले ज्यामुळे ते केवळ दुसरे शास्त्रकार ठरतात.
- त्यांच्या दोन रचना दोन दिग्गज गायकानी मैफिलीत गाऊन अजरामर केल्या. पं. कुमार गंधर्व यानी ‘ नच पार नादनिधीला ‘ही भीमपलास रागातील; तर पं. भीमसेन जोशी यांनी ‘ मन रामरंगी रंगले ‘ हे भजन!.
कलावंतांसाठी कोल्हापूर ही भूमी वंदनीय ठरावी, यासाठी टेंबेंनी केलेले प्रयत्न अनुकरणीय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक नवोदित कलाकार घडले. कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख उभारण्यात टेंबेंचे योगदान विसरणे अशक्य आहे.
आज, ५ जून रोजी गोविंदराव टेंबे यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील सांस्कृतिक संस्थांनी, संगीत विद्यालयांनी आणि नाट्यगृहांनी त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण जागवली. अनेक तरुण कलाकार आणि अभ्यासकांनी टेंबेंच्या कार्याचा नव्याने अभ्यास सुरू केला आहे.
गोविंदराव टेंबे म्हणजे केवळ कलाकार नव्हे, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक आत्म्याचे मूर्त स्वरूप होते. त्यांचे विचार, सूर आणि संवेदना आजही कलाक्षेत्रात गुंजत आहेत.
——————————————————————————