उपराष्ट्रपती पदासाठी सी.पी. राधाकृष्णन

राज्यपाल एनडीएचे उमेदवार : पंतप्रधान मोदींनी केले कौतुक

0
124
Today, Radhakrishnan met Prime Minister Narendra Modi in Delhi.
Google search engine
नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उमेदवारी दिली आहे.

आज राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले “ आज सी.पी. राधाकृष्णन जी यांची भेट घेतली. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांची सार्वजनिक सेवा आणि विविध क्षेत्रातील अनुभव आपल्या देशासाठी फायदेशीर ठरेल. ते देशाची अशीच सेवा करत राहोत, अशी सदिच्छा.”
निवडणुकीचा कार्यक्रम – 
  • ९ सप्टेंबर : उपराष्ट्रपती पदाची निवडणूक
  • २१ ऑगस्टपर्यंत : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
  • २५ ऑगस्टपर्यंत : उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. मात्र, त्यांनी पद सोडल्यानंतर आता ही निवडणूक होत आहे.
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन ?
सी.पी. राधाकृष्णन यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूरच्या चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले. राधाकृष्णन १९७३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले आणि नंतर जनसंघ व भाजपच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात आले.
सी.पी.राधाकृष्णन तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष असून सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य राहिले असून केरळचे प्रभारी देखील होते. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काम केले. तसेच २००४, २०१२ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत ते कोइम्बतूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते.
विरोधकांचा उमेदवार अद्याप गुप्त
भाजपप्रणीत एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत विरोधकांकडून कोणत्याही उमेदवाराचे अधिकृत नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, संयुक्त उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मित्रपक्षांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, तामिळनाडूतून एखाद्या नेत्याला उपराष्ट्रपतीपदाची संधी द्यावी, अशी मागणी आघाडीतल्या काही पक्षांकडून करण्यात आली आहे. या संदर्भात DMKसह काही तामिळ नेते पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तथापि, विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण असणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. आज-उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच याबाबतचा निर्णय स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दक्षिण भारतात भाजपला बळकटी देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच आता उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत त्यांच्याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

——————————————————————————————-

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here