कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्य शासनाच्या शिक्षण विकास आराखड्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भारतीय प्राचीन गुरुकुल परंपरेने प्रेरित आणि आधुनिकतेवर आधारित शालेय शिक्षण व्यवस्था विकसित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारशाला नव्या स्वरूपात सादर करत विद्यार्थ्यांना समग्र आणि तंत्रस्नेही शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश स्पष्ट आहे.
भारतीय गुरुकुल पद्धती ही प्राचीन काळातील शिक्षणाची एक आदर्श प्रणाली मानली जाते. या प्रणालीमध्ये शिक्षक (गुरु) आणि विद्यार्थी (शिष्य) यांच्यातील सखोल नातं, नैतिक मूल्यांचे शिक्षण, ध्यान-धारणा, एकाग्रता, आणि जीवनकौशल्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवणे, केवळ पाठ्यपुस्तकापुरते न राहता, त्यांना समाजोन्मुख बनवणे हे गुरुकुल शिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
कसे असेल शिक्षण:
-
नैतिक मूल्यांचे शिक्षण : विद्यार्थ्यांमध्ये सद्वर्तन, कृतज्ञता, संयम आणि जबाबदारी यांसारखी मूल्ये रुजवणे.
-
आध्यात्मिक व मानसिक विकास : ध्यान, योग, प्राणायाम आदींचा अभ्यास.
-
गुरु-शिष्य परंपरेचा आधुनिक अविष्कार : शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक अर्थपूर्ण बनवणे.
-
प्रकृतीशी एकात्मता : निसर्गाशी जोडलेले शिक्षण – वृक्षारोपण, शेती, पर्यावरण साक्षरता.
-
तंत्रज्ञानाचा समावेश : डिजिटल शिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, स्मार्ट क्लासरूम, ई-लर्निंग इत्यादींचा वापर.
-
राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख दृढ करणे : भारतीय इतिहास, साहित्य, तत्वज्ञान आणि परंपरांची ओळख करून देणे.
प्रायोगिक प्रकल्प : शासनाच्या या उपक्रमाची सुरुवात काही निवडक जिल्ह्यांतील शाळांमध्ये प्रायोगिक स्वरूपात केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात ही प्रणाली टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. या शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा देखील प्रभाव दिसून येईल.
————————————————————————————————



