In Maharashtra, students will now be able to take admission in the B.Sc. Nursing course even if they score zero percentile marks in the CET exam.
मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील वैद्यकीय क्षेत्रावर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात आता सीईटी परीक्षेत शून्य पर्सेंटाईल गुण असले तरी विद्यार्थी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतील. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांनी बारावीतील पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) मध्ये किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
यापूर्वी विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये किमान ५० टक्के गुण आणि बारावीतील पीसीबीमध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य होते. परंतु, अधिक विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि महाविद्यालयातील रिक्त जागा भरता याव्यात, असे हे नवीन नियम राबवण्यात आले आहेत, असे ‘हिंदुस्तान टाइम्स’ने सांगितले आहे.
या निर्णयामुळे काही तज्ज्ञ आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील लोकांना गुणवत्तेत घसरण होण्याची भीती व्यक्त केली आहे. तर, सरकारच्या म्हणण्यानुसार, नर्सिंग हा कौशल्य-आधारित व्यवसाय असल्याने व्यावहारिक कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे आणि प्रवेश परीक्षेतील गुण हे फक्त एक निकष आहे.
नवीन नियमाची अंमलबजावणी : हा नियम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होईल. कमी सीईटी गुण असलेले विद्यार्थी जे पूर्वी नोंदणी करू शकले नाहीत, ते आता सीईटी सेलच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतील. तसेच, ज्यांनी आधीच नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती परंतु पूर्ण केली नव्हती, त्यांनाही ती पूर्ण करण्यास सांगितले आहे.
खाजगी नर्सिंग महाविद्यालयांना फायदा : या निर्णयाचे खासगी नर्सिंग महाविद्यालयांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्रात २०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये बीएस्सी नर्सिंगच्या जवळपास १६,००० जागा असूनही, ७,७५० हून अधिक जागा रिक्त आहेत. म्हणजेच सुमारे ५० टक्के जागा रिक्त राहतात. आता पर्सेंटाईलची अट शिथिल केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे आणि महाविद्यालयांमधील रिक्त जागा भरल्या जातील.