मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नांदणी मठात गेली ३४ वर्षे वास्तव्य करत असलेली माधुरी हत्तीण वनतारा रेस्क्यू सेंटरला हलवल्यानंतर कोल्हापुरात निर्माण झालेल्या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने नांदणी मठाला पुन्हा पाठिंबा दर्शवत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी : बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे थेट निर्णय शक्य नाही. मात्र, नांदणी मठाने जर सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली, तर महाराष्ट्र सरकार स्वतः त्या याचिकेत पार्टी होईल आणि मठाला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राजू शेट्टी पुढे म्हणाले, ” ही फक्त हत्तीण नव्हे, तर कोल्हापुराच्या जनभावनेचा विषय आहे. सरकारने याला प्रतिसाद देणं ही स्वागतार्ह गोष्ट आहे.”
आमदार सतेज पाटील : महादेवी ही कोल्हापूरच्या संस्कृतीचा भाग आहे. जनता, मठ, आणि लोकप्रतिनिधी यांच्या भावना सरकारने समजून घेतल्या, ही सकारात्मक बाब आहे. आता सुप्रीम कोर्टात मठ याचिका दाखल करणार असून, सरकारही बाजू मांडणार आहे.
सरकारचा न्यायालयीन पाठिंबा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले की, मठ सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचारासाठी याचिका दाखल करेल आणि राज्य सरकार त्या याचिकेत अधिकृतरित्या पक्षकार (party) होईल. हत्तीणीची योग्य देखभाल, आरोग्य, निवास, आहार, आणि सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडेल आणि आवश्यक व्यवस्था उभी करेल.
एक पाऊल पुढे हत्तीण परतीच्या दिशेने ?
या बैठकीमुळे महादेवी हत्तीण परत नांदणी मठात आणण्याच्या लढ्याला बळकटी मिळाली आहे. सरकारचा पाठिंबा आणि न्यायालयात पार्टी होण्याचा निर्णय ही जनभावनेच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू मानली जात आहे. आता सर्वांची नजर सर्वोच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकेवर लागली आहे.
उपस्थिती- उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर, आमदार राजू शेट्टी, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, नांदणी मठाचे प्रतिनिधी आणि अन्य लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————————————————–



