कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा निधी सारथी उपकेंद्र कोल्हापूर कार्यालयास प्राप्त झाला असून त्या मधून एकूण २०३ विद्यार्थ्यांना ४ कोटी १३ लाख ४७ हजार १४४ इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे.
त्यामध्ये दिनांक १ जुलै २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील अधिछात्रवृत्ती तसेच दिनांक १ जानेवारी २०२४ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील घरभाडे रक्कम व आकस्मिक खर्चाच्या रकमेचा समावेश आहे. त्यामुळे सद्यस्थितीत एकाही विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रक्कम या कार्यालयाकडून प्रलंबित नाही. अशी माहिती कोल्हापूर सारथी उपकेंद्राच्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजा मधून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीच्या माध्यमाने विशेष प्रोत्साहन देण्यासाठी “छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना” सारथीमार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत सारथी उपकेंद्र कोल्हापूर अधिनस्त चार विद्यापीठांमधून २०१९ ते २०२३ पर्यंत एकूण ४२७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पाच वर्षाकरिता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा ३७ हजार तर पुढील तीन वर्षांसाठी दरमहा ४२ हजार अधिछात्रवृत्ती रक्कम देण्यात येते. तसेच त्यांना शासन नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो असेही पत्रकात म्हटले आहे.
—————————————————————————————–