मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील सरकारी रुग्णालये दवाखाने, आरोग्यसंस्था, रुग्णालयांचे केंद्रीय व राज्य शासकीय संस्थेमार्फत मूल्यमापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. स्वतंत्र संस्था नेमून रुग्णालयांतील आरोग्य सेवेच्या क्षमता, कमतरता, सेवा देताना येणाऱ्या अडचणी, आरोग्य सेवा दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व गुणवत्तापूर्ण दिल्या जातात किंवा नाहीत, त्यामध्ये सुधारणा करून आरोग्य सेवा कशी अधिक बळकट करता येईल, याबाबत शासकीय संस्थेमार्फत मूल्यमापन यंत्रणा उभारून आरोग्य सेवेच्या सर्व पैलूंचा अभ्यास करणार आहे. यामध्ये प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक सेवांचा अभ्यास, मनुष्यबळ, औषधे, प्रयोगशाळा, संदर्भ सेवा इत्यादी बार्बीचा समावेश असणार आहे.
त्याचप्रमाणे रुग्णालय स्तरावर उपचारात्मक सेवा, मनुष्यबळ, औषधे इत्यादींचा समावेश राहील. यासाठी आरोग्य विभागाकडून एक पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाला/समितीला सर्व सहकार्य करण्याचे निर्देश आरोग्य विभाग सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) आणि महापालिका आयुक्तांना निर्देश देणार आहे. हे पथक गाव, तालुका, शहरी भाग, आदिवासी भाग येथील आरोग्य संस्थांना भेटी देऊन संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, औषधांची उपलब्धता याची सविस्तर माहिती घेतली जाईल. या माहितीच्या आधारावर संबंधित पथक/मूल्यमापन यंत्रणेकडून जिल्हानिहाय अहवाल तयार करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रासाठी वेगळा अहवाल तयार करण्यात येणार असून या अहवालानुसार आढळून आलेल्या उणिवा, त्रुटी यामध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून संबंधित प्रशासनाला सूचना देऊन आरोग्य सेवा अधिक बळकट करणार आहे.
लोकांकडून माहिती घेणार –
लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत लोकांशी, लोकप्रतिनिधीशी, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यात येणार आहे. आरोग्य संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा अपेक्षित मानकांप्रमाणे आहेत किंवा नाहीत याची माहिती या मूल्यमाफन यंत्रणेकडूून घेतली जाणार आहे.
———————————————————————————————



