मुंबई : प्रसारमाध्यम वृत्त सेवा
राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाचा आनंद आणि उत्साह लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधी म्हणजेच २६ ऑगस्ट रोजीच बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सणाच्या तयारीत आणि खर्चात दिलासा मिळणार आहे.
सामान्यतः शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मिळते. मात्र, यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष निर्णय घेत १ सप्टेंबरऐवजी २६ ऑगस्टला पगार वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयाद्वारे याबाबत औपचारिक आदेश काढण्यात आला आहे.
या निर्णयाचा लाभ केवळ मंत्रालयीन कर्मचारी किंवा शासकीय अधिकारी यांनाच नाही, तर जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी व अ-कृषी विद्यापीठे, त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी-कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनाही मिळणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात खरेदी, सजावट, देवस्थापना, पूजा साहित्य, घरगुती तसेच सार्वजनिक उत्सव यासाठी खर्च वाढतो. त्यातच महागाईच्या झळा लक्षात घेता, कर्मचारी वर्गाला वेळेत पैसा मिळावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
शासकीय कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. कर्मचाऱ्यांना पगार आधी दिल्यामुळे तयारीला गती मिळेल, तसेच उत्सवात आर्थिक ताण जाणवणार नाही,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.