कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
उकडीच्या मोदकांसाठी खास वापरला जाणारा सुगंधी आंबेमोहर तांदळाला चांगला दर मिळत आहे. सध्या गणेशोत्सव सुरु आहे. गणेशाला प्रामुख्याने उकडीच्या मोदकाचा नैवद्य दिला जातो. ही मोदक बनविण्यासाठी आंबेमोहर तांदूळ वापरला जातो. या तांदळास चांगला भाव मिळत आहे. सध्या बाजारात आंबेमोहर तांदळाचा दर किलोस १८० ते २०० रुपये इतका झाला असून, हा दर आजवरचा सर्वात उच्चांकी असल्याचे तांदळाच्या व्यापार्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून आंबेमोहर तांदळाला मागणी अधिक असून, त्याच्या उत्पादनात घट झाल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. यंदा मान्सूनच्या विलंबामुळे व काही भागांतील पाण्याची टंचाई यामुळे आंबेमोहरचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले. परिणामी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
उकडीचे मोदक हे गणरायाचे आवडते नैवेद्य असल्याने, घरोघरी सणाच्या दिवशी आंबेमोहर तांदळाचा वापर करून मोदक तयार केले जातात. याच पार्श्वभूमीवर अनेक घरगुती महिला उद्योजिका, स्वीट शॉप्स आणि केटरिंग सेवा देणाऱ्या व्यवसायिकांनाही तांदळाच्या वाढत्या किमतीचा फटका बसत आहे.
“सध्या सुगंधी आंबेमोहर तांदळाचा दर कमाल पातळीवर पोहोचला आहे. मागणी वाढलेली असून पुरवठा मर्यादित आहे. पुढील वर्षी उत्पादन वाढल्यास दर स्थिरावू शकतात,” असे एका व्यापार्याने सांगितले.



