प्रसारमाध्यम l दिग्विजय माळकर
Gold Silver Price Today | 17 February 2026
मुंबई : लग्नसराईच्या हंगामात सर्वसामान्य ग्राहकांचे लक्ष लागून राहिलेल्या सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. अवघ्या काही मिनिटांत सोन्या-चांदीचा फुगा फुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांनाही मोठा धक्का बसला आहे.
चांदीत मोठी घसरण
गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात सातत्याने अस्थिरता पाहायला मिळत आहे. 29 जानेवारी रोजी चांदीने इतिहास रचत प्रति किलो 4,20,048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर सुरू झालेल्या घसरणीमुळे आता चांदी तब्बल 1,80,157 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मंगळवारी बाजार उघडताच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.
5 मार्च एक्सपायरी असलेली चांदी सोमवारी 2,39,891 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. मात्र मंगळवारी उघडताच ती थेट 2,35,206 रुपयांवर आली. म्हणजेच एका झटक्यात प्रति किलो 4,685 रुपयांची घसरण नोंदवली गेली.
सोन्याचीही घसरण कायम
चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही घसरण सुरू आहे. 2 एप्रिल एक्सपायरी असलेले सोने 1,54,760 रुपयांवरून घसरून मंगळवारी 1,53,550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. म्हणजेच सोन्यात 1,210 रुपयांची घट झाली.
29 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्यानेही 1,93,096 रुपये प्रति 10 ग्रॅम असा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र त्या पातळीवरून सोन्याचा दर तब्बल 38,336 रुपयांनी घसरला आहे.
ग्राहकांसाठी संधी?
सध्या सुरू असलेल्या घसरणीमुळे दागिने खरेदी करण्याचा विचार पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांसाठी ही संधी ठरू शकते. मात्र तज्ज्ञांच्या मते, दरातील अस्थिरता अजून काही दिवस कायम राहू शकते.






