प्रसारमाध्यम : अमोल शिंगे
कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राचे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येकाला गोकुळचा नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. अरुण डोंगळे राजीनामा देणार का? की त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार? नवा अध्यक्ष कोण असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं शुक्रवार पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्या निवडीवरून राजकारण तपालं आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांची अध्यक्ष पदाची मुदत २५ मे रोजी संपत आहे मात्र त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे यामुळे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबतं सुरु आहेत. अरुण डोंगळे यांच्या या भूमिकेमुळे गोकुळच्या सत्तारूढ गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सत्तारूढ गटात राज्याच्या राजकारणात विरोधी असणारे सर्व जिल्ह्याचे नेते एकत्र आहेत. आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदिप नरके आणि माजी खासदार संजय मंडलिक हे गोकुळच्या राजकारणात शाहू आघाडीच्या माध्यमातून एकत्र आहेत.
गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे याच शाहू आघाडीचे घटक आहेत पण सध्या ते राज्याच्या राजकारणात महायुती सरकार मधील अजित पवार गटाबरोबर आहेत. गोकुळचा पुढचा अध्यक्ष महायुतीचाच व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला सांगितलं आहे, असं कारण पुढे करून त्यांनी गोकुळच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. यामुळे गोकुळच्या राजकारणात चांगलाच पेच निर्माण झाला आहे. पण जिल्ह्यातील महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी असणारे पण शाहू आघाडीशी एकरूप असणारे जिल्ह्याचे नेते अरुण डोंगळे यांच्या विरोधात मोट बांधताना दिसत आहेत. यामुळे अरुण डोंगळे राजीनामा देणार की नाही? का त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार? डोंगळेनी राजीनामा दिलाच तर नविन अध्यक्ष कोण होणार? असे प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला देखील पडले आहेत.
अरुण डोंगळे यांचा राजीनामा घेण्यापासून ते पुढचा अध्यक्ष कोणाला करायचं याच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. गोकुळचा पुढचा अध्यक्ष कोण होणार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत. लवकरच गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक चाणाक्षपणे हातळायचे कसब असणारा नवा अध्यक्ष निवडायचा असेल तर पुन्हा एकदा विश्वास पाटील म्हणजेच आबाजी यांच्या यांच्यावर शाहू आघाडीच्या नेत्यांना ‘विश्वास’ टाकावा लागणार आहे. यामुळे विश्वास पाटील यांच्या गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्ष पदाची माळ पडू शकते.
सध्याच्या सत्तारूढ गटात म्हणजेच शाहू आघाडीत पालकमंत्री प्रकाश अबीटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक हे तीन नेते महायुतीत सहभागी असणाऱ्या शिंदे गटाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अजित नरके हे सध्या सत्तारूढ गटातून संचालक पदावर कार्यरत आहेत. जर महायुतीचा अध्यक्ष करावा लागलाच तर अजित नरके यांची गोकुळच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
सध्या गोकुळ दूध संघाच्या राजकरणांची समीकरणे पाहिली तर आमदार सतेज पाटील यांची कोंडी करण्याचे प्रयत्न दिसून येत आहे. हे कोंडी फोडण्यासाठी आमदार सतेज पाटील हे गोकुळच्या अध्यक्षपदासाठी एक सर्वमान्य चेहरा पुढे आणण्याची खेळी खेळण्याची शक्यता आहे. गोकुळ दूध संघाचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर आणि गोकुळ दूध संघाचं नातं काय आहे हे कोल्हापूरकरानां सांगण्याची गरज नाही. आनंदराव पाटील चुयेकर यांच्याबरोबर गोकुळच्या परिवाराचं आणि ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचं असणारं सहनुभूतीचं नातं पाहून त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील चुयेकर यांचं नाव सतेज पाटील पुढे आणून उलट विरोधकांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. शशिकांत पाटील चुयेकर या नावाला विरोध करणं सत्तारूढ आणि विरोधकानां अडचणीचं ठरणार आहे. यामुळे शशिकांत पाटील चुयेकर हे सुद्धा गोकुळच्या नव्या अध्यक्ष पदाचे दावेदार असू शकतात.
सध्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गोकुळचं राजकारण चांगलंच तापलं आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं बंड कसं थांबवायचं आणि नवीन अध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे सोपवायची यावर खलबतं सुरू आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या अध्यक्ष पदावरून तर्क वितर्क सुरू आहेत. कोल्हापूर जिल्हयाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला गोकुळच्या अध्यक्ष पदाच्या निवडीची उत्सुकता लागून राहिली आहे. अरुण डोंगळे राजीनामा देणार का? की त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार? नवा अध्यक्ष कोण असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं शुक्रवारी पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.






