कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
गोकुळ सहकारी दूध संघ आता फक्त दूध उत्पादनापुरताच मर्यादित न राहता राजकारण आणि पैशांच्या उलाढालीच्या केंद्रस्थानी आला आहे. गेले काही दिवस यावर जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. पुढील वर्षी एप्रिल मध्ये होणार्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, गावागावातील ठराव धारकांच्या मतासाठी जोरदार स्पर्धा दिसून येत आहे.
पैशांचे प्रमाण आणि निवडणुकीवरील परिणाम
कळे (ता. पन्हाळा) येथील धर्मराज सहकारी प्राथमिक दूध संस्थेतील सभेत दोन गटांमध्ये तीव्र आर्थिक स्पर्धा दिसून आली असून एक गट एक लाख रुपये देण्यास तयार तर दुसऱ्या गटाने थेट पाच लाख रुपयांची बोली लावली.
गावातील एका ठरावासाठी तब्बल पाच लाख रुपयांची बोली लावली जात असल्याची घटना स्थानिकांसाठी धक्कादायक मानली जात असून गावागावांत याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाने ठरावधारकांना ‘नजराणा’ म्हणून ५० हजार रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.
जर अशीच पद्धत साडेसहा हजार संस्थांवर लागू झाली, तर निवडणुकीसाठी किती प्रमाणात पैसा खर्च होईल, याचा विचार करताच या प्रक्रियेतील व्याप्ती आणि गती लक्षात येते. हे फक्त वित्तीय प्रश्न नसून, निवडणुकीची नैतिकता आणि पारदर्शकतेवरही गंभीर परिणाम करणारे आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या ठरावावरून झालेल्या हाणामारीच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ” महादेवराव महाडिक यांच्या काळात गोकुळ मध्ये असे प्रकार कधीच घडले नाहीत. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी काही नवे प्रयोग सुरू केल्यामुळे असे घडत आहे,” असे ते म्हणाले.