नृसिंहवाडीत : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कृष्णा नदीला पाणी वाढल्यावर आणि दत्त महाराजांच्या मनोहर पादुकांजवळ पाणी आल्यास येथे पारंपरिक दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावेळी दर्शन व स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. मंदिर परिसर पाण्याखाली गेल्यास उत्सव मूर्ती टेंबे स्वामी मठात नेण्यात येतात. त्या ठिकाणीच त्रिकाल पूजा-अर्चा व धार्मिक विधी पार पडतात. यानंतर पुराचे पाणी वाढल्यास परंपरेप्रमाणे दत्त महाराज गावात येतात.
प्रत्यक्ष दत्त महाराज आपल्या गावात येतात या सोहळ्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो. सुवासिनींकडून मंगलारती केली जाते. पुजारी मंडळी उत्सवमूर्ती व सनकदिक देव मोठ्या मिरवणुकीने गावात आणतात. हा अभूतपूर्व सोहळा दरवर्षी अतुलनीय उत्साहात पार पडतो. नदीचे पाणी ओसरू लागल्यावर मात्र मंदिर पूर्ण रिकामे होण्याआधी देव पुन्हा मूळ मंदिरात नेण्याची परंपरा आहे.
मागील काही वर्षांपासून वाडीकरांना सलग या सोहळ्याचा आनंद मिळत होता. मात्र यंदा संततधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मंदिर पाण्याखाली गेले. आता पावसाचा जोर कमी झाला आणि पूरही ओसरू लागला असला तरी यावर्षी देवगावी आगमनाचा अभूतपूर्व सोहळा पार पडू शकला नाही.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेले असून दत्त महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून हजारो दत्तभक्त दरवर्षी येथे दाखल होतात. गावाला वारंवार पुराचा सामना करावा लागत असला तरी पुजारी व ग्रामस्थ परंपरा अखंड जपतात. मात्र यंदा देवगावी आगमन खंडित झाल्याने भाविक व ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.
—————————————————————————————-