माणसाला दुःख झालं की, आई आठवते पण मोठ्या संकटात बापच आठवतो. यश मिळालं की, आईला नमस्कार करतो पण या यशाच्या आनंदात बापाला मारलेली घट्ट मिठी यशासाठी घेतलेले सर्व कष्ट सार्थक ठरवते. संकटकाळी तर बापाने दिलेली मिठी आधार काय असतो हे सांगून जाते. प्रेमाची विश्वासाची मिठी काय असते याची पहिली जाणीव बापाच्या मीठीतच होते.
असह्य वेदनेने मला जाग आली. गुडघ्याच्या खाली पायाला मुका मार लागून सूज आली होती. सुजलेली जागा ठणकत होती. नेमकी त्याच जागेला झोपेत लाथ मारण्याची सवय असलेल्या माझ्या छोट्या मुलाची लाथ लागली होती. शरीर असो वा मन, बेसावध असताना झालेला आघात खूप वेदना देतो. कळवळून जागा झालो. मुलगा शांत झोपला होता. त्याच्या अंगावर व्यवस्थित चादर घालून थोडी मोकळी हवा घ्यावी म्हणून लंगडतचं गॅलरीत आलो.
दूरवर आकाशाकडे पाहत असताना असाच घडलेला प्रसंग आठवला. माझ्या वडिलांना गाडीचा सायलेन्सर भाजला होता. मी खूप लहान होतो. त्यांच्या कुशीतच झोपायचो. मलाही झोपेत पाय झाडायची सवय होती. झोपेतच मी जोरात पाय मारला आणि भरून आलेल्या जखमेची खपली निघाली. वडील वेदेनेने जागे झाले. जखमेतून रक्त वाहू लागलं. वडिलांनी रात्रभर वेदना सहन केली. रात्री किंवा सकाळी माझ्यावर ओरडले नाहीत की, त्या गोष्टीची कधी वाच्यता केली नाही. प्रसंग सामान्य होता पण बाप काय असतो हे सांगून गेला.
असं किती आणि काय काय त्यांनी सहन केले हे आठवण्याचा प्रयत्न करू लागलो. एकामागून एक प्रसंग किस्से डोळ्यां: समोरून जाऊ लागले. मन खोल खोल भूतकाळात उतरू लागलं.
मुलांचा नैसर्गिक ओढा आईकडे असतो. त्यांच्या जगण्याच्या सर्व संवेदना, भावना आईशी निगडीत असतात. पण बाप ..बाप त्यांची अस्मिता आणि अस्तित्व असतो. ही आई आणि वडिलांची किंवा त्यांच्या प्रेमातली तुलना नाही पण कळत नकळत त्या अव्यक्त प्रेमाची अनुभूती जमेल तेवढ्या शब्दात व्यक्त करायला काय हरकत आहे. शब्द अपरे पडतील याची जाणीव आहे पण किमान भावना तरी पोहोचतील.
बाप म्हणजे स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटणारा हिमालय, आभाळ, आधारवड, एवढ्याच अवकाशात बाप सामावून किंवा समजून घेता येत नाही. वडिलांच्या प्रेमाची अभिव्यक्तीच वेगळी, कर्तव्यातून, त्यागातून कृतीतून दिसणार प्रेम ते समजायला खूप वेळ लागतो . वडिलांचे किस्से कोणी मुद्दामहून सांगत नाही पण बोलण्याच्या ओघात कधी विषय निघालाच तर बापाची महती सांगताना सांगणाराच त्या मैफिलीचा बाप होतो. नेहमीच कर्तुत्ववान माणसाच्या बापाचे कौतुक होते पण बाप रोजगारासाठी कोणताही व्यवसाय करत असो, त्याचे उत्पन्न, जीवनमान, जीवनशैली कशीही असो, गरीब असो श्रीमंत असो, सामान्य असो की, असामान्य तो सर्वात आधी बापच असतो आणि बाप म्हणून असामान्य असतो.
आई गुरु असतेच पण बाप महागुरू असतो. अनुवंशिकते सोबत जे आधुनिक आहे आणि जे जे आपल्या मुलांच्या विकासाला, यशाला, सुखाला पोषक आहे ते ते सर्व देण्यासाठी सगळा आटापिटा असतो. शिकवण्याची सांगण्याची पद्धत कदाचित कडक असेल पण एकदा का तुम्हाला जमायला लागलं की, मग त्यांच्या डोळ्यातील आनंद लपून राहत नाही. त्यांच्या शब्दांपेक्षा त्याच्या डोळ्यांतले प्रश्न, लपवलेले अश्रू, काळजी, आणि अभिमान फार काही सांगून जातात.
तो फारसं बोलत नाही, पण त्याच्या प्रत्येक कृतीत एक संदेश असतो – “तू सक्षम आहेस, तू उभा राहू शकतोस!”
एक दिवस आईला घरात जास्त काम पडल तर आईची स्वाभाविक खूप चिडचिड होते. पण कौटुंबिक आर्थिक, मानसिक, सामाजिक जबाबदाऱ्यांचं ओझं पेलणारा बाप घरी आला आणि कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला की दिवसभराचे श्रम विसरून नव्या दमात नवी जबाबदारी घायला तयार होतो.
आपण लहान असताना आपल्याला चालायला शिकवणारा आणि मोठं झाल्यावर योग्य रस्ता शोधायला मदत करणारा…. शाळेच्या पहिल्या दिवशी पाठीवर ठेवलेला … लहानपणी पहिल्यांदा सायकल चालवताना मागे न दिसणारा पण पाठीवर हलकेच ठेवलेला तो हात … खेळात हरल्यावर दिलेला धीर, आपल्या स्वप्नांवर न बोलता ठेवलेला विश्वास.. आपल्या प्रत्येक अपयशात, एक शब्द न बोलता दिलेली साथ … आयुष्यातल्या संकटांशी लढण्याची दिलेली हिंमत. परीक्षेत यश मिळाल्यावर, आपल्या पहिल्या पगाराच्या किंवा यशाच्या क्षणी डोळ्यांतून चमकणारा आनंद– हे सारे क्षण अमूल्य असतात.
मुलांच्या आयुष्यात सक्रिय भूमिका बजावणारा ..आपली मुले कमी पडू नयेत त्यांना कमीपणा वाटू नये त्यांना कशाची कमतरता भासू नये, आधुनिक जीवनशैलीची उणीव त्यांना भासू नये यासाठी स्वतः साधे राहणीमान स्वीकारून मुलांना सुख सोयी देणारा.. स्वतः हॉटेलात जेवण, पिझ्झा बर्गर खात नाही पण आपल्या बायको मुलांना खाऊ घालण्यासाठी अधिकच काम करणारा.. मुलांना अपेक्षित शाळा कॉलेजात प्रवेशासाठी हेलपाटे मारणारा… बसता उठता चुका काढून मुलाला शहाणपण सांगून बाहेर गेला की, चौकातल्या घोळक्यात आपल्या मुलाचे कौतुक सांगणारा… खांद्यावर बसवून जोतिबाची, टेंबलाईची जत्रा फिरवणारा…गर्दीतले खेळ दाखवणारा..गर्दीतून वाट काढत शिवजयंतीची मिरवणूक आणि दरवर्षी गणपतीचे देखावे दाखवणारा..मुलांना संगीत आवडत म्हणून नवरात्रीच्या कार्यक्रमात लवकर जाऊन जागा धरणारा… फिरायला जाऊ असं सांगून चांगल्या वक्त्यांच्या व्याख्यानाला नेणारा.. खिशाला परवडत नसल तरी मुलांना आवडणारी पुस्तके आणि खेळणी आणणारा… सत्यनारायणाचा असो की कोणत्याही देवाचा प्रसाद.. कोणीतरी दिलेला खाऊ कागदी पुरचुंडीत बांधून घरी आपल्या मुलांना घेऊन येणारा.. कितीही तणाव असला तरी कुटुंबातील प्रत्येकाची आवड निवड जपणारा.. पैसे मागताच ओरडणारा आणि सकाळी कामावर जाता जाता गुपचूप आईकडे पैसे देऊन जाणारा ….मुलांची इच्छा त्यांचे हट्ट पुरवत असताना पूर्ण करत असताना त्यातील धोके स्वीकारून आपल्या मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारा .. स्वतः झिजून कुटुंबासाठी जगणारा.. आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं यासाठी नशिबाशी पण झगडणारा… मुलांसाठी हजारो स्वप्नं बघताना कधी स्वतःसाठी काहीही न मागणारा..देवावर विश्वास नसला तरी आपल्या मुलासाठी नवस बोलणारा… आणि आपल्या मुलांसाठी प्रसंगी तारुण्यातल्या अनेक लहान मोठ्या अपेक्षा आणि सुखद क्षणांचा त्याग करणारा… वयाच्या प्रत्येक टप्प्यावर बापाची वेगळी ओळख होते..
व्यसनी बाप सुद्धा आपला मुलगा निर्व्यसनी रहावा व्यसनांपासून दूर रहावा यासाठी डोळ्यात तेल घालून प्रयत्न करतो. मुलगा उशिरा येणार म्हणून जेवण ताटात झाकून ठेवणारी आई प्रत्येकाला दिसते पण तो येईपर्यंत जागणारा बाप दिसत नाही. मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं तरी वृद्धाश्रमात सुद्धा आपल्या मुलांच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करणारा बाप त्याच्या काळजाला काय म्हणावं. .आपल्याला येत नाही पण मुलांना इंग्रजी बोलताना पाहून बापाला आपल्या मुलाने जग जिंकल्याचा अभिमान वाटतो. मुलांनी आपल्या व्यवसायात किंवा कामात तरबेज होताना, कौटुंबिक जबाबदारी घेताना पाहून बापाचा उर भरून येतो.
तो कधी बोलत नाही.. आपल्या भावना उघडपणे कधी व्यक्त करत नाही.. बदलत्या काळात वडिलांनी आपली भूमिका पण बदलली .. आजचे वडील कुटुंबात अधिक भावनिकरित्या सहभागी होतात. ते फक्त कर्ता नव्हे, तर मित्र, सल्लागार, शिक्षक आणि सहकारीही बनले आहेत. आपल्या यशात, आत्मविश्वासात त्यांच्या पाठीमागील भूमिका फार मोठी असते.
जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा… तुमचा बाप तुमच्यापासून कितीही दूर असो… कसाही असो कोणत्याही परिस्थितीत असो… अंथरुणाला खिळलेला असो… पण तो आहे याची जाणीव जगण्याचं बळ देते.. कितीही मोठ संकट येऊ दे आपला बाप आपल्या पाठीशी आहे… तो घरात आहे ही जाणीवच नवी आशा निर्माण करते. निसर्गतः बापाचे आपल्या मुलीवर विशेष प्रेम असते. आणि मुलीसाठी पण बाप तिचा पहिला हिरो असतो. बापाच्या सर्व भावना आपल्या मुलीसाठी खूपच संवेदनशील असतात. ममत्व, कारुण्य वात्सल्य अशा प्रत्येक भावनेतून तो आपल्या मुलीकडे पाहतो. म्हणून तर तिच्या सुखासाठी जगासमोर प्रसंगी लाचारी पत्करणारा बाप आपला स्वाभिमान मान सन्मान याच्याशी तडजोड करतो. तिच्यासाठी रडताना मात्र तो आपले अश्रू लपवू शकत नाही.
बाप रडताना खूप कमी पहायला मिळतो. ..आपल्या कुटुंबाच्या उर्जेसाठी स्वतःच्या अश्रूंचे पण इंधन म्हणून वापरणारा बाप ..त्याची थोरवी शब्दात मांडता येणं केवळ अशक्य आहे. एखाद्या क्षेत्रांतील कर्तुत्ववान माणसाला पहिले की, आपण त्याला बापमाणूस म्हणतो. त्याचं कर्तृत्व पाहून मनःपूर्वक आदर व्यक्त करतो. तो आदर मनात जपून ठेवतो. त्याच्या जीवन प्रवासाविषयी, त्याने केलेला संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करतो पण घरातील स्वतःचा बाप आणि त्याच्यातला माणूस दोन्ही समजून घेणं शेवटपर्यंत राहूनच जात.
खरं तर बाप कधीच मरत नाही, तो वाहत राहतो आपल्या धमण्यांमधून ….आयुष्यभर …आपण असे पर्यंत या पिढीतून पुढच्या आणि त्याच्या पुढच्या पिढीकडे…एक सांगू वडील गेले की, मगच पोरकेपणा काय असतो याची जाणीव होते म्हणून ज्यांच्या जवळ वडील आहेत त्यांनी एकदा उगाच एक घट्ट मिठी मारून बघा… आकाश कवेत घेतल्याची अनुभूती येईल…
– प्रताप सुधा राजाराम पाटील————————————————————————————————————–