कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
प्रत्येक भारतीय सण स्थानिक निसर्गाशी आणि शेती संस्कृतीशी विणला गेलेला आहे. या सणाद्वारे निसर्गाचे, शेतीचे महत्त्व स्पष्ट केले आहे. निसर्गानुरूप आणि शेतीस पूरक ठरतील असे सण आपल्या पूर्वजांनी तयार केलेले आहेत. या सणातून प्राणीमात्रावर, वृक्षवेलीवर प्रेम करायचे, निसर्गाची जपवणूक कशी करायची याचा संदेशच दिला गेला आहे. प्रत्येक सण एकत्र येऊनच साजरे करायचे असा प्रघातच पाडला गेला आहे. या सणांमुळे आनंद मिळतो. कंटाळा दूर होतो. निराशा राहत नाही. उत्साह वाढतो. उमेद येते.
नवरात्रोत्सवाचे खूपच महत्त्व आहे. निसर्ग बहारलेला असतो. नद्या नाले तुडुंब भरलेली असतात. खरीप हंगामातील पिकं तयार झालेली असतात. आणि लगेच पुढच्या खरीपाची तयारी घटस्थापनेपासून सुरु होते. पिकं ही आपली लक्ष्मी आहे. पिकं आपली संपत्ती आहे. या पिकांच पूजन करून घटस्थापना ते दसरा पर्यंत उत्सवच आपण साजरा करतो. घटस्थापना म्हणजे शास्त्रशुद्ध बीजपरीक्षण होय.
कृषी संस्कृतीत घटस्थापनेला खूप महत्त्व आहे. घटस्थापना एक प्रकारे शास्त्रशुद्ध ‘बीजपरीक्षण’ होय. शेतातून नवीन धान्य घरी आल्यावर शेतकऱ्यांमध्ये नवीन पीक येण्यापूर्वी केलेला हा एक विधी आहे, ज्याद्वारे माती, पाणी आणि बियाण्यांची परीक्षण केले जाते आणि येणाऱ्या हंगामासाठी तयारी केली जाते.
घटस्थापनेचे कृषी-संस्कृतीतील महत्त्व
-
बीजपरीक्षण :घटस्थापना ही पुढील हंगामासाठी बियाणे निवडण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये घटामध्ये माती टाकून काही विशिष्ट बियाणे पेरली जातात आणि घटस्थापनेच्या नऊ दिवसांत त्यांची वाढ कशी होते, यावरून बियाण्यांची गुणवत्ता तपासली जाते.
-
निसर्गाप्रती कृतज्ञता : हे शेतकरी आदिशक्तीची पूजा करून निसर्गाच्या नवनिर्मिती प्रक्रियेला मान देतात.
-
कृषी-वैज्ञानिक संकल्पना : घटस्थापनेच्या मागे माती, पाणी, हवामान आणि बियाण्यांच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्याची एक वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली संकल्पना आहे, असेही अभ्यासक सांगतात.
-
नवीन हंगामाची तयारी : कापणी झाल्यानंतर, नवीन धान्य घरात आल्यावर, घटस्थापनेच्या या विधीतून पुढील खरीप किंवा रब्बी हंगामासाठी कोणती बियाणे चांगली आहेत, याचे संकेत मिळतात.
-
शेतकऱ्यांचा विश्वास : घटस्थापनेत देवीची पूजा केली जात असली तरी, याचा संबंध थेट शेती आणि शेतकऱ्यांशी असल्याने, याला कृषी संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाते.