spot_img
गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025

9049065657

Homeकृषीसरसकट कर्जमाफीची घोषणा करावी : बाळासाहेब थोरात

सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी : बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : प्रसारमा डेस्क 

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि अन्य महत्त्वाच्या मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबविण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका, ही शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये. सत्तेवर येण्यापूर्वी या सरकारने पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पाळणे सरकारचे नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे, सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी करण्यापेक्षा सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी आग्रही मागणी कॉंग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

थोरात म्हणाले, आज सरकारकडे लाखो कोटी रुपयांचे महामार्ग आणि विविध प्रकल्प उभारण्यासाठी पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मात्र सरकारी तिजोरी रिकामी असल्याचा देखावा केला जात आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी समिती कशाला पाहिजे? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी समिती नाही, नियत लागते. या आगोदरही विविध आंदोलने दडपण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याची नौटंकी केलेली आहे; पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र, आता शेतकरी बांधव सरकारकडे लक्ष ठेऊन आहे, त्यांच्यासोबत धोका झाला, तर मात्र या सरकारची खैर नाही.

थोरात म्हणाले, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाले आहेत. ज्वारी, बाजरी, कांदा, भाजीपाला, फळबागा, कापूस, धान आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभरात एकच पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तर ही परिस्थिती अधिकच कठीण झाली आहे. दुसरीकडे बँकांकडून शेतीसाठी कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. अशा वेळी, श्री. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. आज हे आंदोलन तत्वता: पुढे ढकललेले आहे. पुढील काही दिवस त्यांनी तब्येत जपावी आणि उपचारही घ्यावेत.

सरकारने फसवाफसवी थांबवावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कर्जमाफीशिवाय आता पर्याय नाही, काँग्रेस पक्षाची देखील हीच भूमिका आहे. त्यामुळे समितीचे सोहळे करण्याऐवजी सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी; अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक रोखणे कठीण होईल, असाही इशारा थोरात यांनी दिला आहे.

——————————————————————————————–

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments