कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवात सरकार थेट सहभागी होणार असल्याचा विधानसभेत शुक्रवारी निर्णय जाहीर केला आहे. या वर्षापासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा केला जाईल, तसेच सरकार थेट सहभागी होऊन हा उत्सव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीटही काढणार आहे.
घरगुती गणेशोत्सवाची परंपरा अनेक शतकाची आहे तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाली. लोकजागृती व्हावी या हेतूने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. दहा दिवसाच्या या उत्सवात अनेक कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. म्हणूनच हां उत्सव मर्यादित न ठेवता व्यापक करण्याच्या हेतूने हा उत्सव यावर्षी पासून राबविला जाणार आहे. गणेशोत्सव फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता, जिथे मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत अशा भारतातील इतर राज्यांमध्येही आणि परदेशांमध्ये – जसे की अमेरिका, यूके, कॅनडा, युएई इत्यादी देशांमध्ये – हे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील. या उपक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागतिक पातळीवर सन्मान होईल आणि मराठी बांधवांमध्ये एकात्मता निर्माण होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
गणेशोत्सवातील कार्यक्रम महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारे असतील. राज्याच्या कानाकोपऱ्यात आयोजित होणाऱ्या या उपक्रमांमध्ये लोककला, संगीत, नृत्य, चित्रकला, साहित्य आणि पारंपरिक खेळ यांचा समावेश असेल.
संपूर्ण गणेशोत्सव अधिक भव्य आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी शासकीय व अशासकीय संस्थांच्या सहकार्याने या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
————————————————————————————–



