मुंबई : प्रतिनिधी
यंदाचा गणेशोत्सव २७ ऑगस्टला असून कोकणात आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची तयारी सध्या जोमात सुरू झाली आहे. गणेशोत्सव लवकर आल्याने रेल्वे तिकिटांची मागणी अधिक असल्याने प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण २३ जूनपासून सुरू करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा ६० दिवस आधी आरक्षणाची सुविधा प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत असल्याने बहुतांश प्रवासी २५ व २६ ऑगस्ट रोजी कोकणात पोहोचण्याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे या तारखांच्या गाड्यांसाठी जास्त मागणी असून प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून ठेवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
यंदा ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याने या कालावधीत मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. कोकणातील चाकरमानी वर्ग, विद्यार्थी, व्यापारी व धार्मिक भाविक मोठ्या संख्येने या कालावधीत प्रवास करतात.
रेल्वे प्रशासनाने जादा गाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर आणि मीडिया माध्यमांद्वारे जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांनी IRCTC च्या वेबसाईटवर, मोबाईल अॅपवर किंवा रेल्वे तिकीट खिडकीवरून आरक्षण करून घ्यावे, तसेच तिकीट दलालांपासून सावध राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
——————————————————————————–






