कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
सर्व गणेश मंडळांना परवानगी देण्याकरीता पोलीस विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या एक खिडकी योजना कार्यान्वीत करण्यात येणार असून गणेश मंडळानी आवश्यक परवानगी घ्यावी. गणेश मंडळ व पोलीस यांचे समन्वय साधण्याकरीता नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेश मंडळांनी परवानगी करीता स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केले आहे.
गणेश उत्सव २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी विधान भवनात गणेशोत्सव २०२५ हा सण महाराष्ट्राचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व गणेश मंडळांनी आगामी गणेश उत्सव सण डॉल्बीमुक्त साजरा करुन पारंपरिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात करावा.
सर्व गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम राबवावेत. आगामी गणेश उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा करण्याकरीता जास्तीत जास्त महिलांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. गौरी व घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन २ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाचे वतीने ठेवण्यात आलेले विसर्जन कुंड, नदी, विहीर, तलाव या ठिकाणीच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात यावे. तसेच गौरी पूजनाचे निर्माल्य हे विसर्जन ठिकाणी ठेवण्यात आलेले ट्रॉलीमध्ये ठेवण्यात यावे, असेही गुप्ता यांनी आवाहन केले आहे.
जिल्हा पातळीवर आयोजित करण्यात येणारे स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, गणेश मुर्ती आगमन सोहळयाचे वेळी सर्व गणेश मंडळांनी पांरपारिक वाद्याचा (लेझीम, ढोल, ताशा) वापर करावा. यामुळे डॉल्बीच्या आवाजाने होणारे दुष्परिणाम टाळता येईल. तसेच गणेश मुर्ती आगमन व विसर्जन मिरवणुक वेळी लेझर लाईटचा वापर होवून नये, याकरीता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) चे आदेश काढण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे.
—————————————————————————————-