कॉफी वेंडिंग मशीनमुळे गणेश बनले यशस्वी व्यवसायिक

0
240
Google search engine

 

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

भुवनेश्वरचे गणेश परिदा यांनी केवळ २३ हजार रुपये भांडवलावर सुरु केलेल्या कॉफी वेंडिंग मशीनच्या व्यवसायात ३ कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. ५६ वर्षीय गणेश यांनी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन १९९८ मध्ये ‘फ्युचर वेंडिंग’ नावाची कंपनी सुरू केली. आज त्यांची कंपनी ओडिशातील कॉफी वेंडिंग मशीनची सर्वात मोठी वितरक आहे आणि त्यांनी पॉवर ग्रिड, एम्स भुवनेश्वर, एनआयटी राउरकेला, बँक ऑफ इंडिया, टीसीएस, लार्सन अँड टूब्रो आणि केआयआयटी युनिव्हर्सिटी यांसारख्या मोठ्या क्लायंट्सना सेवा पुरवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न साकार करता येतात, याचे गणेश परिदा हे एक उत्तम उदाहरण आहे.

गणेश परिदा यांच्या घरच्यांना वाटत होते की त्यांनी चांगली नोकरी करावी. भुवनेश्वरमध्ये जन्मलेल्या आणि जयपूरमध्ये वाढलेल्या गणेश यांनी ओडिशामध्ये सर्वात आधी हॉट बेवरेज वेंडिंग मशीनची डिस्ट्रीब्युटरशिप सुरू केली. गणेश यांनी १९९१ मध्ये भारती विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे येथून पर्सनल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स केले. त्यांना एसके मशीनरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एचआरची नोकरीही मिळाली होती. तेथे त्यांना १,८०० रुपये महिना पगार मिळत होता. मात्र या नोकरीत ते रमले नाहीत.

अशी सुचली व्यवसायाची कल्पना
गणेश यांना हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या एका जाहिरातीतून व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. जाहिरातीत कॉफी वेंडिंग मशीनबद्दल माहिती देण्यात आली होती. ऑफिसमध्ये कॉफी मशीन लावण्याचा व्यवसाय चांगला चालेल, असे गणेश यांना वाटले. त्यांनी जास्त विचार न करता त्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला. काही आठवड्यांत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या कोलकाता हेड ऑफिसमधून दोन लोक भुवनेश्वरला आले. गणेश यांचा व्यवसाय करण्याची कल्पना नेमकी काय आहे, हे त्यांना पाहायचे होते.गणेश यांनी त्यांना समजावले की भुवनेश्वर ही राजधानी आहे. येथे कॉफी वेंडिंग मशीनचा व्यवसाय चांगला चालू शकतो. त्यांनी मार्केटिंग करण्याची जबाबदारी देखील घेतली.अशा प्रकारे विजन मार्केटिंग  सुरुवात झाली.

२३ हजारांत सुरू केला व्यवसाय
गणेश यांच्या निर्णयाने त्यांचे कुटुंबीय खुश नव्हते. त्यांचे वडील एका सरकारी कंपनीत मेकॅनिक होते. गणेश आपले शिक्षण वाया घालवत आहेत, असे त्यांना वाटत होते. कुटुंबाला व्यवसायात धोका वाटत होता. पण, नंतर त्यांच्या वडिलांनीच त्यांना २३ हजार रुपयांची मदत केली. त्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतूनच त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कधीही कुटुंबाकडून पैसे घेतले नाहीत. जेव्हा हल्दीराम यांनी त्यांच्याकडून दोन कॉफी वेंडिंग मशीन खरेदी केल्या, तेव्हा गणेश यांना पहिले मोठे यश मिळाले. त्यावेळी कॉफी वेंडिंग मशीन फ्रिजएवढी मोठी होती. फ्युचर वेंडिंग केवळ कॉफी मशीन विकण्यापुरतेच मर्यादित नव्हते. गणेश यांनी मशीनसोबत कॉफी, चहा आणि सूपचे प्रीमिक्स देखील विकायला सुरुवात केली.याव्यतिरिक्त, ते मशीनची सर्व्हिसिंग देखील करत होते.अशा प्रकारे गणेश यांनी आपल्या कंपनीला हॉट बेवरेजच्या सर्व गरजांसाठी वन-स्टॉप शॉप बनवले.

मोठमोठ्या कंपन्या ग्राहक, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार
फ्युचर वेंडिंग हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, नेस्ले, सोसायटी टी, सेन्सो फूड्स आणि वाघ बकरी टीचे अधिकृत डीलर बनले. २०१५ मध्ये गणेश यांनी डिजिटल आणि लहान वेंडिंग मशीन विकायला सुरुवात केली. या मशीनमध्ये टच स्क्रीन आणि प्रोग्रामेबल फीचर्स होते. लवकरच ही मशीन लहान-मोठ्या ऑफिसमध्ये लोकप्रिय झाली. त्यांनी इटलीतील एस्टोरिया आणि गागिया यांसारख्या मोठ्या ब्रँडच्या बीन-टू-कप मशीनची विक्रीसुद्धा सुरू केली. या मशीनची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही मशीन बरिस्तासारखी कॉफी बनवते. ऑफिस आणि मोठ्या संस्थांमध्ये या मशीनची मागणी वाढेल, असे गणेश यांना वाटते.गणेश यांची पत्नी रंजीता देखील कंपनीत पार्टनर आहेत.गणेश परिदा यांच्या संघर्षाची कहाणी निश्चितच प्रेरणादायी आहे. 

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here