लंडन : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारताने ६ धावांनी थरारक विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत राखली. हा विजय केवळ सामना जिंकण्यापुरता मर्यादित नव्हता, तर भारतीय संघासाठी आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी तो मोठा दिलासा देणारा क्षण ठरला.
४ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्याच्या अखेरच्या क्षणी, जेव्हा मोहम्मद सिराजने गस एटकीन्सन याला क्लीन बोल्ड केलं, तेव्हा स्टेडियमवर उपस्थित हजारो भारतीय चाहत्यांनी जल्लोषात आसमंत दणाणून टाकला. मैदानावर भारतीय खेळाडूंनी एकमेकांना मिठ्या मारत आनंद साजरा केला. ड्रेसिंग रुममध्येही विजयाचा मोठा उत्सव पाहायला मिळाला. कायम गंभीर चेहरा ठेवणारे हेड कोच गौतम गंभीरही या वेळी आनंदाने हसताना दिसले, हे दृश्य लाखमोलाचे ठरले.
टीम इंडिया या सामन्यात एकवेळ पिछाडीवर होती. मात्र, युवा खेळाडूंच्या अफाट मेहनतीने आणि संयमी कामगिरीने भारताने विजय खेचून आणला. विशेषतः शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच कसोटी मालिका होती, आणि ती बरोबरीत राखणे ही लक्षणीय कामगिरी मानली जात आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावरून आजी-माजी खेळाडूंसह लाखो चाहत्यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर गौतम गंभीरनेही एक्स ( माजी ट्विटर ) वर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणतो : “आम्ही कधी जिंकू, कधी हारु, मात्र आम्ही कधीही आत्मसमर्पण करणार नाही. शाब्बास पोरांनो !”
गंभीरच्या या प्रतिक्रियेत संपूर्ण मालिकेचा सारांश सामावलेला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वगळता गंभीरच्या मार्गदर्शनात भारताला अद्याप फार मोठं यश गवसलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. मात्र इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्या भूमीत रोखून ठेवणे ही नक्कीच मोठी उपलब्धी आहे.
भारताच्या या विजयाने गंभीरचा आत्मविश्वास उंचावला असून, आगामी कसोटी आणि वनडे मालिकांसाठी भारतीय संघ पुन्हा सज्ज होत आहे. युवा खेळाडूंनी दिलेली ही कामगिरीची झलक भारतीय क्रिकेटचं भवितव्य उज्वल असल्याचं संकेत देत आहे.
———————————————————————————————



