कोल्हापूर : प्रतिनिधी
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच आपण सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलो आणि यासाठी मला माझ्या आईवडीलांची खंबीर साथ मिळाली, अशा शब्दात गडहिंग्लज येथील श्रेयश बसर्गे या केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणांने आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त केल्या.
गडहिंग्लज येथील एका सामान्य कुटुंबातील मुलाने जिल्हापरिषदेच्या शाळेत शिकत केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात येणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची परीक्षेत यश मिळवून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होण्यासाठी मोठ्या नामांकित शाळेत शिकूनच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येतं, हा गैरसमज दूर केला आहे आणि त्या तरुणाचं नाव आहे श्रेयश बसर्गे..
श्रेयस बसर्गे हा मुळचा गडहिंग्लज येथील रहिवासी पण त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण काळाम्मावाडी येथील जिल्हापरिषेदेच्या शाळेतून पूर्ण केले. या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रेयशने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी कागल तालुक्यातील नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला. श्रयेश हा मुळातच हुशार विद्यार्थी होता. इयत्ता नववी मध्ये असताना त्याच्या शाळेने त्याची केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाद्वारे स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत राजस्थानमध्ये एक वर्ष शिक्षण घेण्यासाठी निवड केली होती. दहावी मध्ये असताना श्रेयस बसर्गेने इंटेल कंपनी द्वारा देण्यात येणारा राष्ट्रीय टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन अवॉर्डचे प्रथम पारितोषक पटकावले होते.
श्रयेश बसर्गे याने त्याचे पदवीचे शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले. तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवीधर आहे. ग्रॅज्युएशनच्या दरम्यान श्रयेशने २ राष्ट्रीय आणि १ आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स चॅम्पियनशिप पारितोषक पटकावली आहेत. यातच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सन २०१९ मध्ये त्याने या दिल्लीला जाऊन परीक्षेचा अभ्यास सुरु केला. सन २०२१ मध्ये त्याने पहिल्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली मात्र त्याला यात अपयश आले. अपयश आलं म्हणून तो खचून गेला नाही. त्याने पुन्हा त्याच उमेदीने प्रयत्न सुरु ठेवले. सन २०२२ आणि २०२३ मध्ये सुद्धा त्याला अपयशाला सामोरे जावे लागले पण चौथ्या प्रयत्नात म्हणजेच २०२४ ला दिलेल्या परीक्षेत यश श्रयेशला हुलकावणी देऊ शकले नाही. २०२४ मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या परीक्षेत श्रयेश उत्तीर्ण झाला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरच श्रयेशने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशात वडील संजय बसर्गे, आई गीता बसर्गे आणि त्याच्या शिक्षकांचे योगदान मोठे आहे.
“निकाल लागताच माझे ध्येय गाठले याचा मला आणि माझ्या कुटुंबियांनाही खूप आनंद झाला आहे. हा आनंद मिळवण्यासाठी काही वर्षे घेतलेले कष्ट दडलेले आहेत. त्यांचा विसर कधीच पडू देणार नाही. मला आयुष्यात एक चांगली संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग चांगल्या कामासाठीच करण्याचा माझा विचार पक्का आहे,” अशी प्रतिक्रिया श्रयेश बसर्गेने व्यक्त केली.