मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोल्हापूर नागरी प्राधिकरणाला सेक्शन ४० अंतर्गत विशेष बाब म्हणून नेमण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने विचाराधीन घेतला असून, यासंदर्भात येत्या दोन महिन्यांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विधानसभेत देण्यात आली. कोल्हापूर करवीर चे आमदार चंद्रदीप नरके यांनी यासंदर्भात विधिमंडळ अधिवेशनात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सरकारकडून ही माहिती देण्यात आली.
आज (१६ जुलै) झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हा मुद्दा मांडला. त्यांनी “कोल्हापूर नागरी प्राधिकरणातील गावांच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची आवश्यकता आहे. सेक्शन ४० अंतर्गत प्राधिकरणाला विशेष बाब म्हणून मान्यता दिल्यास विकास कामांना गती मिळेल,” असे अधोरेखित केले.
या मुद्द्यावर उत्तर देताना शासनाने सांगितले की, सेक्शन ४० अंतर्गत प्राधिकरणाची नेमणूक करण्यासंदर्भात दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येईल आणि त्यानुसार निधीही मंजूर केला जाईल.
यापूर्वी सातत्याने प्राधिकरणातील गावांच्या दुर्लक्षित विकासावर अनेकांनी आवाज उठवला होता. या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असून नागरी सुविधांसाठी स्वतंत्र नियोजनाची गरज आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले होते.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्राधिकरणातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. निधी मंजूर झाल्यानंतर रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधा उभारण्यास मदत होणार आहे.
—————————————————————————————–



