मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगाराच्या आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ७५० कोटी रुपयांपैकी पहिला टप्पा म्हणून तीनशे कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
राज्य सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ७५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यासंदर्भातील शासन निर्णय १५ जुलै रोजी जारी करण्यात आला असून, नियोजन विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या निधीतून महामंडळाकडून चालवल्या जाणाऱ्या स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या विविध योजनांना आर्थिक बळकटी मिळणार आहे.
मराठा समाजासाठी विशेष योजना
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना मराठा समाजातील तरुणांना उद्योजकतेकडे वळवण्यासाठी करण्यात आली आहे. महामंडळाद्वारे कमी व्याजदरात कर्ज, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यावसायिक मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येते.
महायुती सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील नव्या उद्योजकांना आधार मिळेल, त्यांचं स्वप्न साकार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निधी वर्गामुळे स्थानिक पातळीवर नवे व्यवसाय उभे राहण्यास मदत होणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना स्वावलंबनाच्या दिशेने पावलं उचलण्यास मोठं प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास राज्य शासनाच्या वर्तुळांतून व्यक्त करण्यात येत आहे.
——————————————————————————————-






