पुणे : प्रसारमाध्यम न्यूज
आपला जीव धोक्यात घालून नागरी वस्तीत साप दिसल्यावर क्षणात मदतीला धावून येणारे सर्पमित्र आता केवळ स्वयंसेवक नव्हे, तर अधिकृत ‘फ्रंटलाईन वर्कर’ म्हणून ओळखले जाणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्पमित्रांना ‘फ्रंटलाईन वर्कर’चा दर्जा देण्यासाठी शिफारस केली आहे. याचबरोबर शासनाकडून सर्पमित्रांना १० लाख रुपयांचा अपघाती विमा आणि अधिकृत ओळखपत्र देण्याचा निर्णयही अंतिम टप्प्यात आहे.
धोका पत्करून वन्यजीवांचा जीव वाचवणारे नायक
ग्रामीण भाग असो वा शहर, साप आढळताच नागरिकांची भीती वाढते. अशा वेळी धावून येणारे सर्पमित्र केवळ नागरिकांचाच नव्हे, तर त्या सापाचा जीवही वाचवतात. विषारी असो वा बिनविषारी, हे सर्पमित्र न घाबरता सापाला पकडतात आणि त्याला नैसर्गिक अधिवासात सोडतात. काही वेळा सर्पदंशाची, गंभीर दुखापतीची अथवा जीव गमावण्याचीही वेळ त्यांच्यावर येते. अशा धोकादायक परिस्थितीतही हे सर्पमित्र जीव धोक्यात घालून आपलं काम करत असतात.
ओळखही मिळेल, विमा कवचही!
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आता सर्पमित्रांना केवळ सामाजिक नव्हे तर प्रशासकीय मान्यताही मिळणार आहे. अधिकृत ओळखपत्रामुळे त्यांच्या कार्याला कायदेशीर आधार मिळेल आणि १० लाखांचा अपघाती विमा हे आर्थिक सुरक्षाकवच ठरेल.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सर्पमित्रांचा समाजातील वाटा मोठा आहे. वन्यजीव आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांच्यासाठी शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात आली आहे.”
सर्पमित्रांची वाढती संख्या आणि नवी दिशा
अलिकडच्या काळात शहरांमध्ये साप आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सर्पमित्रांची संख्या वाढताना दिसते. मात्र, या संख्येबरोबरच एक चिंता जाणवते ती म्हणजे प्रशिक्षणाची कमतरता. काही सर्पमित्र अपुऱ्या माहितीसह काम करताना गंभीर जखमी होतात. त्यामुळे सर्पमित्रांची अधिकृत नोंदणी, प्रशिक्षण आणि सुरक्षा यावर भर देण्याची गरज आहे.
पूर्वी गारुडी, नागवाला बाबा यांचं अस्तित्व ग्रामीण भागात होतं. हे लोक साप सांभाळायचे, खेळवायचे. पण आज अशा परंपरा लोप पावत आहेत. त्यांच्या जागी आता प्रशिक्षित सर्पमित्रांची नवी पिढी उदयास आली आहे. मात्र, सर्पमित्र हा ‘फॅशन’चा नव्हे, तर जबाबदारीचा व्यवसाय आहे, याची जाणीव सर्वांना हवी. सोशल मीडियावर सापासोबत फोटो टाकण्यापेक्षा सर्पमित्र म्हणून काम करताना सुरक्षा आणि जबाबदारी यांना अधिक महत्त्व द्यायला हवे.
——————————————————————————————-



