मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही योजना यशस्वीपणे पुढे जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “ महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. अट पूर्ण असलेल्या महिलांच्या खात्यावर निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.”
आर्थिक स्वावलंबनाचा नवा टप्पा
या योजनेने महाराष्ट्रातील माता-भगिनींचा अखंड विश्वास जिंकला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची ही क्रांती यशस्वीपणे पुढे जात असून, लवकरच सर्व पात्र लाभार्थींच्या आधार संलग्नित बँक खात्यांमध्ये निधी जमा होईल. थेट खात्यावर पैसे जमा होत असल्यामुळे योजनेत पारदर्शकता राखली जात असून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये सहभाग वाढण्याची संधीही त्यांना मिळत आहे.






